23.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ रेशन कार्ड नसणाऱ्यांना तात्काळ रेशनकार्ड देऊन धान्य वितरण करा – जिल्हाधिकारी

रेशन कार्ड नसणाऱ्यांना तात्काळ रेशनकार्ड देऊन धान्य वितरण करा – जिल्हाधिकारी

Ø  तालुकास्तरावर शिवभोजनाचे योग्य व्यवस्थापन करा Ø  सोशल डिस्टन्सिंग पालन करा

0
226

भंडारा,दि. 22 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्ह्यातील लॉकडाऊन मध्ये अनेकांना आपल्या व्यवसायापासून वंचित रहावे लागले आहे. अशा परिस्थिती शासनातर्फे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी ज्या पात्र व्यक्तींकडे रेशन कार्ड नाही अशा कुटूंबांना तात्काळ रेशनकार्ड देवून धान्य वितरित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे प्रदीपचंद्रन यांनी दिल्या.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी जिल्हयातील पोलीस अधिकारी, तहसिलदार,  खंडविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची  बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित  करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ,    आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे, डॉ. प्रशांत उईके जिल्हा यावेळी उपस्थित होते.

रेशनकार्ड नसणाऱ्या जिल्हयातील सर्व कुटूंबांना तात्काळ धान्याचा पुरवठा करण्यासाठी सर्व तहसिलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी व रेशनकार्ड वितरित करण्यासाठी मोहिम राबवावी असे ते म्हणाले. वयोवृध्द व दिव्यांगांना सुध्दा धान्याचा पुरवठा करण्यासाठी त्यांची यादी शेअर करावी. दिव्यांग व्यक्तींकडे पैसा नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तु ते घेऊ शकत नाहीत. त्यांना किराणा किट देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी तहसिलदारांना दिल्या. निवारागृहातील व्यक्तींना कौशल्याचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावा. किराणा असोशिएशनची बैठक घेवून त्याबाबत आढावा घ्या. सर्व तालुक्यातील शिवभोजन व्यवस्था योग्य रितीने सुरु ठेवावी. जेणेकरुन कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तहसिलस्तरीय क्वारंटाईन मध्ये कोणत्याही प्रकारे अडचण भासणार नाही याकडे तहसीलदारांनी  लक्ष देण्याची सूचना त्यांनी यंत्रणांनी केली.

बँकेने नागरिकांसाठी पेंडालची व्यवस्था करुन सोशल डिस्टन्सिंगचे पालन  करावे. जिल्हयातील बाहेरगावी असलेल्या व्यक्तींची विचारणा करुन त्यांच्या सुविधेबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जिल्हावासीयांना केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची दक्षता घ्या. त्या अनुषंगाने मी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य विभागाने जिल्हयात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करुन पोलीस, तलाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी करुन घ्यावी. तहसिलदारांनी फार्मासिस्ट असोसिएशनची बैठक घेऊन औषधांचा मुबलक साठा ठेवण्याबाबत चर्चा करावी. नागरिकांना औषधांचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हयात सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु असून बाहेर जिल्हातून आलेल्या व्यक्तीस किंवा कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तालुकास्तरावर संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात येते आहे.  मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींची विशेष यादी तयार करावी. त्यावर तहसिलदार व खंड विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा. तसेच होम क्वारंटाईन व्यक्तींची फेर तपासणी करण्यासाठी चमु तयार करुन माहिती घ्यावी. यासाठी माहितगार कर्मचारी नियुक्त करुन ग्रामीण भागात अन्य जिल्हयातील इतर मार्गाने  व्यक्ती आल्या असतील तर त्यांची नोंद घेवून यादी तयार करावी, अशा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिल्या. ग्रामीण भागातील होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींना दररोज  भेट देवून तसा अहवाल सादर करावा.

जिल्हाबाहेर जाण्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी नियुक्त प्राधिकारी पासेस देणार असून उपविभागीय अधिकारी व महसूल अधिकारी यांनी अंतर्गत बाबींसाठी पासेस निर्गमित करावे.  पासेस साठी ऑनलाईन अर्ज अपलोड करा किंवा पोलीसांशी संपर्क साधा, असे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. रमजान हा मुस्लीम धर्मियांचा सण असून या कालावधीत सोशल डिस्टंन्सिंगचे पालन योग्य व्हावे यासाठी त्यांच्या धार्मिक नेत्यांशी बैठक घेवून चर्चा करा. तसेच हॉटस्पॉट एरियातून आलेल्या लोकांना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल करा. बांधकाम परवानगी देतांना कामगार व त्यासाठी लागणाऱ्या साहित्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. तलाठी व इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी पॉवर प्रझेंटेशनद्वारे कोवीड 19 प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत कन्टेंमेंट प्लॉन, बफर झोन, झोन मधील वाहन र्निजंतुकिरण, वैधकीय अधिकारी व कर्मचारी,कर्मचाऱ्यांचे संरक्षण किट याबाबत माहिती दिली. तीव्र स्वासदाह आजारावर बारीक नजर ठेवा, अशा सूचना  जिल्हाधिकारी  यांनी आरोग्य विभागाला दिल्या.