नागपूर,दि.23ः दिल्लीमार्गे इंडोनेशियावरून नागपूरला आलेले मुळचे चंद्रपूर येथील कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरलेले दाम्पत्य बुधवारी पूर्णपणे बरे होत घरी परतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कोरोना कक्षातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही रुग्णांचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले आणि निरोप दिला. मेडिकलमधून रुग्णवाहिकेने या दोघांनाही सुरक्षित स्थानी पाठविण्यात आले. रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे हे विशेष.
एकीकडे नागपूर शहरात कोरोनाचा धोका वाढत असतानाच आज ही दिलासादायक घटना घडली़ ६ एप्रिलला उपचार सुरु करण्यात आलेल्या या ३९ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर दुस-याच दिवशी ७ एप्रिलला त्यांच्या ३२ वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर ३९ वर्षीय पतीला सुट्टी देण्यात आली. मात्र पत्नीचा अहवाल अद्यापही निगेटिव्ह न आल्याने त्यांना सुरक्षितरित्या रुग्णालयातच ठेवण्यात आले.
यावेळी डॉ.सजल मित्रा,डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह डॉ.कांचन वानखेडे, डॉ. फैजल, डॉ. स्नेहल, डॉ.मुरारी सिंग, डॉ.श्याम राठोड, डॉ. चेतन वंजारी, डॉ.विपुल मोदीख डॉ. पटनाईक, मालती डोंगरे, फार्मासिस्ट चक्रबर्ती व उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. सर्व नागरिकांनीही शासन आणि प्रशासनातर्फे करण्यात येणा-या आवाहनांचे पालन करून घरीच राहावे, असे आवाहन बरे झालेल्या दाम्पत्यातर्फे करण्यात आले.





