नागपूर, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयात कार्यरत माहिती अधिकारी रितेश भुयार यांची अमरावती जिल्हा माहिती कार्यालयात माहिती अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने नागपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नागपूर विभागीय कार्यालयात आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर–अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते श्री. भुयार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी श्री. भुयार यांनी नागपूर विभागीय कार्यालयात केलेल्या कार्याचा उल्लेख करत, त्यांची कार्यतत्परता, समन्वयाची भूमिका आणि जबाबदारीची जाणीव यामुळे विभागाच्या कामकाजात मोलाचे योगदान मिळाल्याचे सांगितले. अमरावती येथे माहिती अधिकारी म्हणून त्यांना मिळालेल्या नव्या जबाबदारीतही ते आपल्या अनुभवाच्या बळावर उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करत संचालक डॉ. गणेश मुळे यांनी त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही श्री. भुयार यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री. भुयार यांनीही नागपूर विभागीय कार्यालयात कार्यरत असताना मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि नव्या जबाबदारीतही विभागाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना व्यक्त केली.या प्रसंगी माहिती अधिकारी अतुल पांडे, अविनाश महालक्ष्मे, रमाकांत दाणी, तसेच संचालक कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.





