23.8 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लीम बांधवांनी काळजी घ्यावी अल्पसंख्याक विभागाच्या सूचना

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लीम बांधवांनी काळजी घ्यावी अल्पसंख्याक विभागाच्या सूचना

0
484

गोंदिया दि.24 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू केला आहे. 3 मे 2020 पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. भारतीय दंड संहिता कलम 144 अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भात यापुर्वीच राज्य शासनाने आदेश दिले आहे. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत असून मुस्लीम बांधव सामुहिक नमाज अदा करण्यासाठी एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा विचार करता सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे हे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्याच्या व जिविताच्या दृष्टीने हिताचे नसल्याने राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने काही सूचना दिल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार करण्यास एकत्र येऊ नये. घराच्या/ इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. कोणत्याही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन साजरा करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरात नियमीत नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराच्या बाहेर पडू नये. अर्जुनी/मोरगाव व सडक/अर्जुनी तालुक्यातील सर्व मुस्लीम बांधवांनी याची नोंद घ्यावी. असे अर्जुनी/मोरगावच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी कळविले आहे.