24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Top News महाराष्ट्रात करोनाबाधित मृतांची संख्या ३०० च्या पुढे

महाराष्ट्रात करोनाबाधित मृतांची संख्या ३०० च्या पुढे

0
245

मुंबई(वृत्तसंस्था)दि.25ः देशातील सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश मिळालेलं नाही. राज्यात गेल्या गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद झाली असून ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८१७ झाली आहे. तर मृतांची संख्या ३०० च्या पुढे गेली असून ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान दुसरीकडे देशातील करोनाबाधितांची रुग्णांची संख्या २४ हजार ५०६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ५७ जणांचा मृत्यू तर १४२९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत आढळलेल्या २४ हजार ५०६ जणांपैकी १८ हजार ६६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ५६०३ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलेलं आहे. देशात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ७७५ झाली आहे.

करोनाबाधितांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता २०.५७ टक्क्यांवर
करोनाबाधितांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता २०.५७ टक्क्यांवर पोहोचले असून गेल्या २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण न आढळलेले जिल्हे १५ झाले आहेत. तर ८० जिल्ह्य़ांमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये नवा रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. देशभरात ९.४५ लाख संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख ए. के. सिंह यांनी दिली. या लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली तर त्यांची तातडीने नमुना चाचणी घेऊन उपचार केले जातील, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यांमधील आरोग्यमंत्र्यांशीही   चर्चा केली. देशामध्ये समूह संसर्ग झाल्याचे अद्याप तरी आढळलेले नसून करोनाचा तिसरा टप्पा टाळण्यात यश मिळाल्याचे दिसत आहे, असे  त्यांनी स्पष्ट केले.

blank