
लॉकडाऊनमुळे रोजगारासाठी दूरवरुन राज्यात आलेल्या कारागिरांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु भंडारा जिल्हा प्रशासनाने जाणिवेने केलेल्या कार्यवाहीमुळे निवाऱ्यासोबत रोजगाराचा प्रश्नही सुटला आहे. भंडारा येथील निवारागृहात राहात असलेले 34 कामगार आपल्या परंपरागत झाडू बनविण्याच्या कौशल्यातून दिवसाला 8 हजार रुपयाचे उत्पन्न मिळवित आहेत.
लॉकडाऊनमुळे जिल्हा व राज्याच्या सिमा सिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात इतर राज्यातून आलेल्या कामगारांचा आपल्या राज्यात परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. छत्तीसगड राज्यातील 34 कामगार लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी भंडारा येथे झाडू विक्री करण्यासाठी आलेले होते. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर ते भंडारा विश्रामगृहाबाहेर ठिय्या लावून बसले होते. जिल्हा प्रशासनाने दखल घेवून या कामगारांचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह येथील निवारागृहात निवारा व भोजनाची व्यवस्था करुन दिली. या ३४ कामगारांमध्ये १३ पुरुष, ११ महिला व १० बालकांचा समावेश आहे. निवारागृहात हे सर्व कामगार काही न करता बसून राहिल्याने कंटाळले होते. त्यासोबतच काम बंद पडल्याने कर्ज कसे फेडायचे, पैसा कुठून आणायचा म्हणून विवंचनेत होते. या संकटसमयी त्यांच्या मदतीला धावून आल्या त्या मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल रजनी वैद्य. आणि येथून त्यांच्या रोजगाराची व मदतीची कथा सुरू झाली.
श्रीमती वैद्य यांनी आपल्या मित्र परिवाराला मदतीचे आवाहन केले. अनेकांनी त्यांना कपडे उपलब्ध करुन दिले. ही मंडळी झाडू बनविणारे कुशल कारागिर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिल्यास झाडू तयार करणार का अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावर त्यांनी अतिशय आनंदाने तयारी दाखवली. या झाडूंची विक्री करण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासनही त्यांना शासकीय यंत्रणेने दिले. त्यानंतर लगेच कच्चा माल आणला गेला आणि झाडू निर्मितीला सुरुवात झाली. वसतीगृह परिसरातच झाडू तयार करण्याचे काम सुरू झाले. त्या आधी श्रीमती वैद्य यांनी स्थानिक दुकानदारांशी चर्चा करून १० ते १२ हजार रुपयांच्या झाडूची ऑर्डरही बुक केली. भंडाऱ्याचे तहसिलदार अक्षय पोयाम यांनी यासाठी स्थानिक दुकानदार संघटनेच्या अध्यक्षांशी चर्चा केली. पोयाम यांनी केलेल्या तडजोडीनंतर त्यांना प्रती झाडू २० रुपये याप्रमाणे ७ ते ८ हजार झाडूंची विक्री करण्यास दुकानदार मंडळी सहमत झाली. या उपक्रमामुळे त्यांना जीवन जगण्याची नवी आशा निर्माण झाली. निराशेच्या वातावरणातही त्यांना नवा उत्साह संचारला. या उपक्रमातून १ लक्ष ६० हजार रुपये उत्पन्न मिळणार असल्याने या कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या उपक्रमाची माहिती पालकमंत्री सुनिल केदार यांना तहसिलदार अक्षय पोयाम यांनी दिली. टाळेबंदीत रोजगार निर्मितीचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असावा अशा शब्दात पालकमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन प्रशासनाचे अभिनंदन केले.
मेहनतीची तयारी आणि त्याला शासकीय यंत्रणेसह समाजाने पाठबळ दिल्यास प्रतिकुल परिस्थितही जगणे सुखकर करता येते असे या कामगारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यांना प्रशासनानेही तितकीच भक्कम साथ दिली आहे. भंडारा येथील या उपक्रमातून प्रेरणा घेतल्यास राज्यात इतरत्र अडकलेल्या असंख्य मजूर व कामगारांना आर्थिक आधार तर मिळेलच सोबत टाळेबंदीचा त्रासही वाटणार नाही.





