25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राष्ट्रीय देश अडकलेले मजूर,विद्यार्थी घरी जाऊ शकणार; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिलासा

अडकलेले मजूर,विद्यार्थी घरी जाऊ शकणार; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिलासा

0
399

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.29 :  कोरोना व्हायरसच्या संकटापासून देशाच्या नागरिकांना लांब ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले होते. मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरांमध्ये रोजगारासाठी गेलेले लाखो मजूर, शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी अडकून पडले होते.त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्राने रेल्वे किंवा रस्ता मार्गाने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.त्यावर  आता केंद्र सरकारने या त्रासलेला लोकांना मोठा दिलासा दिला आहे. मजूर, प्रवासी. तिर्थयात्री, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने यासाठी नियमावली बनविली असून त्याद्वारेच परराज्यातील लोकांना पाठविता किंवा आणता येणार आहे. राजस्थानातील कोटामध्ये हजारो विद्यार्थी अडकले होते. महाराष्ट्रापासून अनेक राज्यांनी या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. गृहमंत्रालयाने केलेल्या नियमावलीनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. तसेच या अडकलेल्य़ा नागरिकांना परत आणण्यासाठी एका एसओपीची तैनाती करावी लागणार आहे. यानंतर या राज्यांना एकमेकांसोबत इच्छुक लोकांसाठी चर्चा करावी लागणार आहे. याचबरोबर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. यानंतरच या लोकांना पुढे सोडण्यात येणार आहे. या लोकांना स्थानिक प्रशासनाकडून क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच या लोकांना आरोग्य सेतू अॅप वापरासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या अडकलेल्या नागरिकांची ने-आण करण्यासाठी बस वापरण्याची सूचना करण्यात येणार आहे. मात्र, या बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगनुसार नागरिकांना बसविण्याची अट घालण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शऱद पवार यांच्यासह अन्य राज्याच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे मजूर, कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जाऊ देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. तसेच मजूर, प्रवासी, विद्यार्थ्यांकडूनही मागणी करण्यात येत होती.