
गोंदिया,दि.04ः– महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनच्या काळात दिलासा देताना सोमवारपासून नॉन कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह दारुच्या विक्रीला सुद्धा परवानगी दिली. परंतु, राज्यातील दारुबंदी असलेले गडचिरोली,वर्धा व चंद्रपूर जिल्हे वगळता इतर 6 जिल्ह्यांधिकाऱ्यांनी दारु विक्रीवरील निर्बंध कायम ठेवले आहेत.आज सोमवारपासून राज्यात दारुविक्रीला परवानगी दिली जात असली तरीही भंडारा, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अमरावतीने दारु विक्री करणार नाही असा निर्णय घेतला आहे.नागपूर महानगरपालिका क्षेत्रात बंदी कायम ठेवण्यात आली आहे. या सर्वच जिल्ह्यातील प्रशासनाने तसे आदेश काढले आहेत. अत्यावश्य वस्तू आणि सेवांसह दारु विक्री सुरू करण्याचा निर्णय महसूल वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राज्य सरकारला दारु विक्रीतून 45 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु, कोरानामुळे गेल्या दीड महिन्यांपासून यावर बंदी होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय महामारी कायदा आणि महामारीचा फैलाव रोखणे या गोष्टी लक्षात ठेवूनच करण्यात आला आहे.भंडारा, बुलडाणा,जालना,औरगांबाद,सोलापूर आणि अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा 17 मे पर्यंत दारु विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला. या सहाही जिल्ह्यांमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांना परवानगी असणार आहे. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात वायनरी आणि दारु उत्पादन कारखाने आहेत. या सर्वांनाच राज्य सरकारच्या दारु विक्रीच्या निर्णयाने खूप अपेक्षा होत्या. परंतु, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने त्यांना विक्रीची परवानगी तुर्तास देणार नाही असा निर्णय घेतला आहे.
तर नागपूरने सुद्ध आपल्या शहराच्या हद्दीत दारु विक्री होणार नाही असा आदेश काढला आहे. नागपूरमध्ये हा निर्णय केवळ महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला नाही. अर्थातच नागपूरमध्ये ही बंदी केवळ शहर आणि महापालिका हद्दीत राहणार आहे. ग्रामीण नागपूरमध्ये अशी कुठलीही बंदी नाही.





