गोंदिया दि.4ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दक्ष राहून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे.उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे.त्यामुळे 24 दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.यामुळेच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे.दरम्यान गोंदिया तालुक्यातील गर्रागावातून छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्याचा व्यक्तीने प्रवास केल्यानंतर तो पाॅझिटिव्ह आढळून आल्याने त्याला दुर्ग येथे शासकीय विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाबाबत सावधगिरीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.काही व्यक्तींना घरीच तर काहींना शासकीय संस्थांमध्ये अलगीकरणात ठेवण्यात येत आहे.संशयित व्यक्तीच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 259 व्यकतींच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी 233 व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये 232 नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.1 नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
आज 4 मे रोजी 8 व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.एकूण 26 नमुन्यांचा चाचणी अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेला एकमेव रुग्ण 26 मार्चला आढळून आला.त्या रुग्णावर उपचार करण्यात आले.त्याच्या घशातील स्त्रावाचा चाचणी अहवाल 10 एप्रिल रोजी निगेटिव्ह आल्यामुळे तो बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्ह्यात 24 दिवसाच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.त्यामुळे केंद्र सरकारने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे.राज्यात केवळ सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये असून त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग व पोलीस विभागाने जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलल्यामुळे कोरोनाचा विस्तार झाला नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सात संस्थात्मक अलगीकरण केंद्रात 69 व्यक्ती उपचार घेत आहेत.यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल-20,एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज,गोंदिया -17, चांदोरी-11 ,लिटिल बर्ड कॉन्व्हेंट,नगर परिषद तिरोडा – 5, समाज कल्याण निवासी शाळा,डव्वा – 6,शासकीय आश्रमशाळा इळदा -5 आणि बिरसी उपकेंद्र येथे 5 अशा एकूण 69 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूबाबत काही माहिती व सल्ला पाहिजे असल्यास त्यांनी हेल्पलाईन क्रमांक.8308816666 आणि 8308826666 यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम यांनी केले आहे.





