सडक अर्जुनी,दि.05ः – परप्रांतात मोल मजुरी साठी गेलेले गावातील कुटुंब आता गावाकडे परतत असल्याने गावातील ईतर नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढवत असल्याचे चित्र गावा गावांत दिसत आहे. आज पळसगाव/ड येथे असेच किमान 50 बाहेरगावी गेलेले मजूर सकाळीच गावांत आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. मात्र मात्र माहिती मिळताच गटविकास अधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी व बाहेरून आलेले मजूर यांच्यात समन्वय साधून योग्य तो तोडगा काढून चिंता दूर करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. सविस्तर असे की, सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव /ड येथील 10-12 कुटुंब हे कमवायला तेलंगण राज्यातील खमंग येथे गेले होते. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने या मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांनी गावाकडे जाण्याचा निर्धार केला. मात्र रेल्वे, बस सेवा बंद असल्याने या सर्वांनी ट्रक बनवून तेलंगण राज्यातून आपले गाव पळसगाव गाठले. मात्र आधीच कोरोनाची दहशत गावांत असल्याने गावातील नागरिकांची चिंता वाढली. सरपंच डॉ. भूमेश्वर पटले आपल्या सहकारी यांच्यासह बाहेरून आलेल्यांनी गावातील शाळेतच थांबण्याचा सल्ला दिला. लगेच याची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच गटविकास अधिकारी प्रकाश निर्वाण यांनी विस्तार अधिकारी पंचायत खुणे, प्रभारी विस्तार अधिकारी आरोग्य लोकेश कटरे तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे शालेय तज्ञ भागचंद्र रहांगडाले, गटसमन्वयक राधेश्याम राऊत यांच्यासह पळसगाव येथे भेट देऊन ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह आलेल्या सर्व मजुरांना क्वारंटाईन करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. त्यानंतर बाहेरून आलेल्या मजुरांची भेट घेऊन त्यांना कोरोना संदर्भात मार्गदर्शन करून क्वारंटाईन मध्ये राहण्याची सूचना केली.
पळसगाव/ड येथे बाहेरून आलेल्यांनी वाढवली प्रशासनाची चिंता!
* तब्बल 50 मजूर पोहोचले गावांत. *गटविकास अधिकारी निर्वाण यांनी घटनास्थळी पोहोचून दिली समज.





