30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता वाघाच्या हल्य़ात तेंदुपत्ता मजुराचा मृत्यू

वाघाच्या हल्य़ात तेंदुपत्ता मजुराचा मृत्यू

0
233

गडचिरोली,दि.०९:: तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावालगतच्या जंगल परिसरात गेलेल्या एका इसमाला वाघाने ठार केल्याची घटना आज ९ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली. अभिमन नारायण झिलपे (५०) रा. कोंढाळा असे मृतकाचे नाव आहे. आरमोरी-देसाईगंज या मार्गावर असलेल्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावच्या जंगल परिसरात  ही घटना घडली. गेल्या15 दिवसातील ही दुसरी घटना होय. 

आज सकाळच्या सुमारास अभिमन झिलपे हे गावालगतच्या जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाघाने त्यांना ठार केले. त्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली. वनविभाग, पोलिस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. अभिमन झिलपे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. कोंढाळा परिसरात दरवर्षीच वाघाची दहशत असते. यावर्षीही परिसरात वाघाचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.