
गडचिरोली,दि. १2 (जिमाका) :,जिल्ह्यात संचारबंदीमूळे काही प्रमाणात स्थिरावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शासनाकडून रोजगार हमीची कामे सुरु करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायतींपैकी ३00 ग्रामपंचायतींनी कामे सुरु केली आहेत. या ठिकाणी आज रोजी ३0 हजार ४२ लोकांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित ग्रामपंचायतीमध्येही तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
ढोबळमनाने ३0 हजार लोकांना कमीत कमी २३८ रु. प्रतिदीन मजूरी प्रमाणे जिल्ह्यात ७१ लक्ष रुपये प्रतिदीनी तर दर आठवड्याला ४.९९ कोटी रूपये मजूरी स्वरुपात शासनाकडूून दिले जात आहेत. यातून काही प्रमाणात संबंधित नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळत आहेत. याचबरोबर गावस्तरावर आवश्यक भौतिक सुविधांची निर्मितीही होत आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त माजगी, घरकुल कामे, बोडी, नाला बांधकाम, नर्सरी यांची कामे सुरु आहेत. यामध्ये वेगवेगळया १२७४ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्हा राज्यात पहिल्या १0 जिल्ह्यांमध्ये नरेगा अंतर्गत रोजगार निर्मितीमध्ये आहे. ३0 हजार लोकांना मजुरी उपलब्ध केल्याने शासनाकडून चांगल्या प्रकारे गरजूंना मदत दिली जात आहे. कोणालाही रोजगार हमी योजनेबाबत काही अडचणी असल्यास तालुकास्तरावर गट विकास अधिकारी अथवा तहसिलदार यांना संपर्क करावा. कामाच्या ठिकाणी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही याची प्रशासन काळजी घेण्यात येत आहे. यासाठी मजुरांनीही शाररिक आंतर ठेवून सहकार्य करावे.
धनाजी पाटील
उपजिल्हाधिकारी, रोहयो





