सडक अर्जुनी(महेंद्र टेंभरे),दि.17::- तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सर्वात मोठे गाव असलेल्या सौंदड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सात वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात रुपांतरण करण्यात आले.तेव्हापासुन या ग्रामीण रुग्णालयाला अवकळा आली असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांअभावी ग्रामीण रुग्णालय नरकयातना भोगत आहे.सोबतच तज्ञ वैद्यकीय अधिकार्यांच्या अभावामुळे रुग्णालयाच रुग्णांच्या जिवावर उठले की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे.येथील बहुतांश अधिकारी कर्मचारी वर्ग हा जिल्हा सामान्य रुग्णालयात हस्तारींत करण्यात आला आहे.
गेल्या सातवर्षापासून सोयीसुविधांसह डॉक्टर,परिचारिका व कर्मचाऱ्यांचा अभाव आहे.आवश्यक यंत्रसामग्रीची कमतरता अशा एक ना अनेक समस्या या रुग्णालयात आहेत. या रुग्णालयात अनेक रिक्त पदे असुन एक प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, एक कंत्राटी वैद्यकीय अधिकारी,एक शिकाऊ वैद्यकीय अधिकारी, तीन परिचारिकेवर रुग्णालयाचा भार आहे.कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांचे भरोश्यावर शालेय आरोग्य तपासणी चालत आहे.या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि चार परिचारिकाचे पदे रिक्त असुन आरोग्य तपासणी साठी रुग्णांना खासगी डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते.अद्ययावत यंत्रसामग्री व मुलभूत सोयी सुविधांच्या अभावामुळे ग्रामिण भागातील रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
करोना विषाणूच्या संक्रमणापासुन बचाव करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी २२ मार्चपासुन लागू करण्यात आली आहे.त्यामुळे अनेक लोक जिथे आहेत तिथेच अडकले आहेत.अशातच बिलासपूर येथील चंद्रकला जुम्हारे (वय ६५वर्ष) आपल्या सुन व नातवंडासोबत २० मार्चला गोंदिया येथील डॉ.कटरे यांच्याकडे नेहमीप्रमाणे तपासणीसाठी आल्या होत्या.उपचारकरुन चंद्रकला जुम्हारे,कंचन अनिल जुम्हारे,अदिती अनिल जुम्हारे,अनंत अनिल जुम्हारे हे सर्व सौंदड येथील प्रशांत चु-हे यांच्याकडे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले.त्यातच लाॅकडाऊनमुळे त्या सौंदड येथे अडकल्या.शासनाने अडकलेल्या लोकांना स्वगावी परत जाण्यासाठी उपाययोजना केल्या.त्या अनुषंगाने बिलासपूर जाण्यासाठी संबधितांनी ऑनलाईन फॉर्म भरले.वैद्यकीय अधिकारी कडून तपासणी करूनच ऑनलाईन परवानगी घ्यावी लागते.सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात ५ मे रोजी जाऊन तपासणी केली.आणि दोन दिवसांनी वैद्यकीय अहवाल मिळेल असे त्यांना सांगितले गेले.वैद्यकीय अहवाल मागण्यास गेले असता सकाळी १०.३०वाजेपर्यंत ग्रामिण रुग्णालयासमोरील दार बंद करुन कर्मचारी बाहेर उभे होते.कर्मचा-याला विचारले असता बुद्ध पोर्णिमा असल्याने रुग्णालय बंद आहे,उद्या आपल्याला वैद्यकीय अहवाल मिळेल असे सांगण्यात आले.तसेच ज्यांच्याकडे वैद्यकीय अहवाल आहे ते बाहेरून अपडाऊन करीत असल्याने ते आल्यानतंर मिळेल असे सांगितले गेले.त्यानतंर दुसऱ्या दिवशी संबधित अहवालाकरीता गेले असता वैद्यकीय अहवालच तयार झालेले नाही असे सांगून टाळाटाळ करण्यात आली.यासर्व प्रकरणात वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यामुळे चंद्रकला जुम्हारेंना विनाकारण त्रास सहन करावा लागला.शेवटी चंद्रकला जुम्हारे व कंचन जुम्हारे यांनी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील वैद्यकीय अधिकारी यांचे कडुन वैद्यकीय अहवाल आणले,मात्र सौंदडच्या ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यानी त्यांना आठवडा फिरवूनही वैद्यकीय अहवाल न दिल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसोबतच प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाणा चु-हे यांनी केली आहे.





