25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Top News नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद; ३ जवान जखमी

नक्षल चकमकीत पीएसआयसह एक शिपाई शहीद; ३ जवान जखमी

0
674

गडचिरोली,दि.१७(विशेष प्रतिनिधी): नक्षल्यांनी लावलेल्या अॅम्बूशमध्ये आज पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने(३०) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल व सी-६० पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून लगेच गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. मात्र, यात पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले, तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली व दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर आहे.blank

शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले, तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अजूनही घटनास्थळावर चकमक सुरु आहे.

शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.

२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली व कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का हिला कंठस्नान घातले होते. तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षल्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी हिंसक कारवाया करणे सुरु केले आहे.