
गोंदिया,दि.18ः क्षयरोग हा आजार नोटीफायबल असल्यामुळे प्रत्येक क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकार्यांकडे वेळेत कळविणे बंधनकारक असले तरी खासगी व्यावसायीक त्यांच्याकडे असलेली माहिती वेळेत आणि व्यवस्थित पाठवित नसल्याच्या पार्श्वभूमीवर अशा खाजगी व्यावसायीकांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी दिली आहे.
क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या आहे. या रोगाचे संक्रमण थांबविण्याकरीता व क्षयरोगाचे नियंत्रण करण्यासाठी क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान आणि संपूर्ण औषधोपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे रुग्ण शासकीय आरोग्य संस्थेमध्ये औषधोपचार घेतात त्याच प्रमाणात खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांकडे रुग्ण औषधोपचार घेतात. चुकीचे रोगनिदान आणि अनियमीत औषधोपचार यामुळे औषधोपचारात दाद न देणारा डी.आर.टीबी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे क्षयरोग हा नोटीफायबल आजार म्हणून घोषित करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या संदर्भीय पत्रानुसार खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, खाजगी औषध विक्रेते, खाजगी प्रयोगशाळा यांनी त्यांच्याकडील क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे. याकरीता शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार टीबी नोटीफिकेशन करीता ५00 रुपये तसेच रुग्णाचा संपूर्ण औषधोपचार पुर्ण झाल्याचे कळविल्यानंतर ५00 रुपये इंसेन्टीव्ह देय आहे. तसेच उपचारावर असणार्या सर्व क्षयरुग्णांची सिबीनॅट तपासणी, एचआयव्ही तपासणी, आरबीएस तपासणी , जी की शासकीय आरोग्य संस्थामध्ये विनामूल्य आहे. तसेच रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे व उपचाराअंती आउटकम टाकणे अत्यंत आवश्यक आहे.
क्षयरुग्णांची खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी निक्षय या ऑनलाईन पोर्टलवर नोंदी करणे आवश्यक आहे. २0२0 मध्ये जानेवारी-४९ रुग्ण, फेब्रुवारी-३३ रुग्ण, मार्च-२८ रुग्ण व एप्रिलमध्ये १७ रुग्णांची निक्षय ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी झालेली आहे.
खाजगी रुग्णालये, खाजगी औषध विक्रेते व खाजगी प्रयोगशाळा यांनी त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद निक्षय अँपद्वारे घेवून शासन यंत्रणेस कळविण्यात यावे. भारत सरकारच्या राजपत्रानुसार माहिती न देणार्या खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, खाजगी औषध विक्रेते, खाजगी प्रयोगशाळा चालक यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता-१८६0 अधिनियम ४५ चे कलम २६९ व २७0 नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
जिल्ह्यातील खासगी क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायीक, खासगी औषध विक्रेते व खाजगी प्रयोगशाळा यांचे ऑनलाईन प्रणालीमधील नोंदी झालेल्या नसेल तर त्यांनी क्षयरोग केंद्रातील कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या संस्थेची अँपमध्ये नोंद करुन घ्यावी. जिल्ह्यात कोविड या विषाणूमुळे साथरोग परिस्थिती उदभवलेली आहे. क्षयरोग हे कोविड या विषाणुच्या संक्रमणास अतिजोखीमग्रस्त असल्याने त्यांचे निदान वेळेत होऊन औषधोपचार सुरु होणे आवश्यक आहे. तरी खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, खाजगी औषध विक्रेते व खाजगी प्रयोगशाळा यांनी वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रा.ज.पराडकर यांनी कळविले आहे.




