26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर मिळालेच नाही

उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर मिळालेच नाही

0
206

अर्जुनी मोरगाव,दि.19: वैश्विक महामारीत रूपांतर झालेल्या कोरोना विषाणूने देशासह राज्यात थैमान घातले आहे. शासन, प्रशासन कोरोना आपत्तीशी लढा देत आहेत. खबरदारी म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले. राज्य व जिल्ह्यातही संचारबंदी कायदा लागू करुन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. दरम्यान लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्वसामान्यांची गैरसोय होवू नये, याकरीता केंद्र शासनाने उज्जवला योजनातंर्गत मिळणारे सिलिंडर तीन महिने मोफत देण्याची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात सिलिंडरची रक्कम महिला खातेधारकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. परंतु, तालुक्यातील लाभार्थी अद्यापही शासकीय सवलतीच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे उज्जवला योजनेतंर्गत देण्यात येणारी सवलत काही क्षेत्रापुरतीच मर्यादीत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार, कामधंदे ठप्प पडल्याने सर्वसामान्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे. शासनाने धुरमुक्तीकडे वाटचाल करीत ग्रामीण व शहरी भागातील स्वच्छ इंधन मिळावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गरीब लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरची जोडणी दिली. संचारबंदी काळात उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांकरिता मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यानुरूप प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस धारकांच्या खात्यावर सिलिंडरची रक्कम खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. दरम्यान प्रत्येक महिन्यात खात्यावर जमा झालेली रक्कम उचल करून गॅस सिलिंडर घेण्याची मुभा लाभार्थ्यांना होती. यामध्ये पहिल्या महिन्याची किस्त जमा झालेली रक्कम उचल करून गॅस सिलिंडर भरल्यानंतरच दुसर्‍या महिन्याची सवलत लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होईल, अशी अट शासनाच्या वतीने घालण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍या महिन्याची रक्कम जमा होऊन पैशाची उचल करून गॅस सिलिंडर उचल केल्यानंतरच त्या महिन्याची किस्त जमा होईल, असे सांगण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेताना पहिल्या महिन्याची जमा झालेली रक्कम उचल करून गॅस सिलिंडरची रक्कम उचल करणे गरजेचे आहे. मात्र अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उज्ज्वजा योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक लाभार्थ्यांना अद्यापपर्यत एप्रिल महिन्याची किस्त मिळाली नसल्याने शासनाची ही योजना फसवी आहे काय? असा प्रश्न उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पडला आहे. अनेकदा लाभार्थी गॅस पुरवणार्‍या एजंन्सीमध्ये जाऊन हेलपाटे मारत आहेत. आज होईल, उद्या होईल अशी उत्तरे ऐकून लाभार्थी गेल्या पावली हिरमोड होऊन परत येत आहेत. त्यामुळे ही योजना फसवी असल्याचे चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.