25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ तीन दिवसापासून अडकले मध्यप्रदेशच्या सीमेवरच मजूर

तीन दिवसापासून अडकले मध्यप्रदेशच्या सीमेवरच मजूर

0
433

गोंदिया,दि.21 : रोजगारासाठी मुंबई येथे गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे आपल्या स्वगृही परतत आहे. दरम्यान मुंबईहून पायीच मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या रजेगाव येथील सीमेवर मागील तीन दिवसांपासून रोखून ठेवण्यात आले. या मजुरांना मध्यप्रदेशात परतण्यासाठी तेथील सरकारने परवानगी दिली नसल्याने या शेकडो मजुरांचा मागील तीन दिवसांपासून येथेच मुक्काम आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगधंदे व रोजगाराची साधने संपूर्ण ठप्प पडली आहेत. याचा सर्वाधिक फटका मजुरांना बसला आहे. रोजगार नसल्यामुळे मुंबई, पुणे येथे रोजगारासाठी गेलेले मजूर आता आपल्या गावाकडे परतत आहे. शासनाने मजुरांना त्यांच्या स्वगृही पोहचविण्यासाठी रेल्वे गाड्या आणि बसेसची व्यवस्था केली असली तरी बरेच मजूर अद्यापही रेल्वे मार्गाने पायीच येत आहे. असेच मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील शेकडो मजूर मुंबईहून पायी आपल्या राज्यात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा असलेल्या रजेगाव सीमेवर मागील तीन दिवसांपासून त्यांच्याकडे परवानगी नसल्याने थांबवून ठेवण्यात आले आहे.या मजुरांसोबत त्यांचे कुटुंबीय असून यात गर्भवती महिला आणि लहान बालकांचा सुध्दा समावेश आहे. तब्बल दहा ते पंधरा दिवस पायी प्रवास करुन व हालअपेष्टा सहन करुन हे मजूर आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचले. सीमेवर पोहचल्यानंतर आता आपण आपल्या राज्यात पोहचू असा या मजुरांना आत्मविश्वास होता.मात्र मध्यप्रदेशाची सीमा असलेल्या रजेगाव नाक्यावर या सर्व मजुरांना पोलिसांनी अडविल्यानंतर या सर्व मजुरांचे चेहरे हिरमुसले. आपल्या राज्यात जावू देण्यासाठी मजुरांसह त्यांचे कुुटुंबीय पोलिसांना याचना करीत होते. मात्र नियमामुळे पोलिसांना सुध्दा त्यांची मदत करता आली नाही.

मुंबईहून पायी आलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील मजुरांकडे परवानगी पासेस नसल्याने त्यांना रजेगाव येथील सीमेवरच थांबवून ठेवण्यात आले आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यासाठी राहण्यासाठी टेंट आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच या मजुरांना मध्यप्रदेशात प्रवेश देण्यासाठी तेथील प्रशासनाची परवानगी मागण्यात आली असून परवानगी मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या राज्यात पोहचविले जाणार आहे.