चंद्रपुर,दि.21ः-कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाने देशात निर्माण झालेल्या आपात्कालीन परीस्थितीला हातभार म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारा गोळा करण्यात आलेला 1 लाख 3 हजाराचा निधीचा धनादेश आज (दि.21)जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री कोविड सहायता निधीकरीता देण्यात आला.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, राष्ट्रीय महासचिव सचिन राजुरकर, जिल्हाअध्यक्ष नितीन कुकडे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शाम लेडे, सल्लागार रामराव हरडे, सौ. रजनीताई मोरे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यांसाठी देशभर चालणारी एक चळवळ आहे. विविध सामाजिक उपक्रम महासंघाच्या माध्यमातून राबविण्यात येत असतात. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे.यासाठी सातत्याने महासंघाची आंदोलनात्मक कार्यपध्दती सुरु आहे.त्यातच कोविड-19 करीता सध्या देश व राज्य पातळीवर जी आपात्कालीन परीस्थिती ओढवली त्यास हातभार म्हणून महासंघाने सदर निधी गोळा करुन मुख्यमंत्री निधीत सुपूर्द केला आहे.यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजु हिवंज, अशोक टिपले, देवराव दिवसे, प्रदिप पावडे, मनोज गौरकर, सौ. अर्चना माशीरकर, सौ. विजयाताई बोढे, सौ. रेखा वंजारीसह आदींचा सहभाग राहिला आहे.





