धुळे (प्रतिनिधी)-शिरपूर जिल्हा धुळे येथील प्रविण शांताराम माळी (जन्म ०६ जानेवारी १९८३) यांनी शिरपुरच्या एकलव्य सांस्कृतिक परिवारातून व राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून विविध मराठी नाटके सादर केलीत. ‘मर्दच षंढ की षंढच मर्द’ या नाटकातील तृतीयपंथी ‘हिरा’च्या भूमिकेला मिळालेल्या विविध पुरस्कारामुळे त्यांना नाटकांची आणि रंगमंचाची गोडी लागली. सोबतच जिल्हा परिषद, जळगाव, तालुका चोपडा येथे शिक्षकाची भूमिका बजावत असताना ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बालनाट्ये, पथनाट्ये, लेझीम पथक, नवोपक्रम, कृती संशोधन इत्यादी माध्यमातून शाळेची गोडी लावली. उपक्रमशील शिक्षक, आदर्श शिक्षक व सृजन गुरूजन गौरव अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला यातूनच त्यांनी शिक्षकाची जबाबदारी अतिशय योग्य प्रकारे बजावली असल्याचे दिसून येते; तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक असून सध्या सेवेत आहेत. त्यांच्या नावावर नुकताच नाट्य क्षेत्रातील नवा विक्रम महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाला.
खान्देशातील अहिराणी बोलीभाषेतील सौंदर्य जगासमोर आणावे या उदात्त हेतूने ‘आयतं पोयतं सख्यानं’ हा तुफान विनोदी अहिराणी भाषेतील एकपात्री प्रयोगाचे ज्यामध्ये ४५ पात्रे आहेत त्याचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि सादरीकरण त्यांनी स्वतः केले. खान्देशी लोकगीते, लोकसाहित्य, लग्न संस्कृती, दैव संस्कृती, खाद्य संस्कृती व भाषिक संस्कृतीवर या नाट्य प्रयोगाची रचना करण्यात आली आहे. या एकपात्री नाट्य प्रयोगात ५ वर्षांपासून ८० वर्षांपर्यंतच्या तब्बल ४५ स्त्री-पुरुष पात्रे आवाजासह अगदी हुबेहूब हालचाली करून तब्बल दोन तास नाट्यकलाकार प्रविण शांताराम माळी हे बहारदार सादरीकरण करतात. लग्न जमविणे, लग्नाची बोलीबंधन (बैठक), बस्ता, देव आणणे, मांडव टाकणे, हळदीचा समारंभ, पोखणे, लग्नाच्या वर्हाडींचा प्रवास, वरातीत नाचणे व प्रत्यक्ष लग्न विधी याचे मनोरंजनात्मक वर्णन या प्रयोगात केले जाते.
नाट्य प्रयोगाच्या शेवटी बाप आणि मुलगी व आजचा युवक कसा असावा हे दर्शवताना प्रेक्षकांच्या डोळ्यातून कधी अश्रुच्या धारा लागतात हेच कळत नाही.
‘आयतं पोयतं सख्यानं’ हा नाट्य प्रयोग सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत प्रेक्षक हसून-हसून पूर्णपणे लोटपोट होतात. सखोल मनोरंजनातून परिपक्व समाजप्रबोधन करत संपूर्ण खान्देशासह, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये देखील या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले आहे.
प्रविण शांताराम माळी यांच्या कामाचे फलित म्हणून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली येथे प्रशिक्षक म्हणून २०१४ मध्ये त्यांची निवड झाली. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात बालभारती येथे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ‘खेळू, करू, शिकू’ या पुस्तक लेखनातही नाट्य विषयाच्या लेखन कार्यात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
दिवसा विद्यार्थ्यांना शिकविणे आणि रात्री एकपात्री नाट्य प्रयोगातून लोकांचे प्रबोधन करून हास्याचा खळखळाट निर्माण करून आजच्या भारतीय संस्कृतीत निर्माण झालेल्या विकृतीवर प्रकाशझोत टाकणार्या नाट्यवेडे शिक्षक प्रविण शांताराम माळी यांच्या समाजप्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांच्या अहिराणी भाषेतील २८० एकपात्री नाट्य प्रयोगांची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. विक्रमवीर प्रविण शांताराम माळी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





