सडक अर्जुनी,दि.26::- परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मुळ राज्यात सोडण्याचे काम सध्या मोठ्याप्रमाणात सुरु आहे.त्यातच मुबंई येथून अशाच मजुरांना घेऊन छत्तीसगडकडे निघालेल्या बसमधील एका व्यक्तीचा मृत्यू बसमध्येच झाल्याने खळबळ माजली आहे.सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच बसचालकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तालुक्यातील सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात सरळ बस नेली.बसच्या पाठोपाठ पोलीसही पोचल्याने नागरिकात त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला यावरच चर्चां सुरु झाल्या असून शंकाना उधाण आले आहे.
स्थलातंरीत व्यक्तींना नेणार्या या बसमधील एका इसमाची अचानक प्रकृती खालावल्याने त्याचा बसमध्येच मृत्यू झाल्याने सदर बस ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली.सध्या कोविड-१९ या आजाराने संपूर्ण देशात थैमान घातले असून रोजगारानिमित्त अडकलेले स्थलांतरीतांना त्यांच्या राज्यात सोडण्यात येत आहे.या स्थलातंरीतांना सोडणारी बस २५ मे २०२० ला मुंबई येथून छत्तीसगडकडच्या सीमेजवळ असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी चेकपोस्टपर्यंत यांना पोचविणार होती.तिथून त्या राज्याची बस त्या स्थलातंरीत मजुरांना त्यांच्या गावात सोडणार होती.या बसमध्ये अंदाजे २५ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.त्याचबसमधील एका व्यक्तीचा झालेला मृ्त्यू कशाने झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.त्यातच त्या मृत व्यक्तीवर सौंदड येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.





