24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह एकूण संख्या 19

भंडारा जिल्ह्यात पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह एकूण संख्या 19

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने तपासणी करून घ्यावी                                                             - जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन

0
808

भंडारा, दि. 27 : -जिल्हयात बाहेरून येणाऱ्या सर्व नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी व प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी. याशिवाय अन्य तालुक्याच्या ठिकाणी थेट पोहोचणाऱ्या नागरिकांनी बस स्थानक परिसर व तहसील कार्यालयामध्ये नावाची नोंद करावी. गावांमध्ये थेट पोहोचणाऱ्यांनी गावातील यंत्रणेला, आशा वर्करला याबाबत माहिती द्यावी, योग्य उपचाराने कोरोना आजार हा बरा होतो. त्यासाठी वैद्यकीय उपचार कक्षात राहणे आवश्यक आहे. याची नोंद ठेवून नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.

जिल्ह्यात 18 पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात आणखी आज 1  नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे रुग्णांची संख्या एकूण 19  झाली आहे. या परिस्थितीत नागरिकांनी स्वयंप्रेरणेने जिल्हा प्रशासनाला आपल्या आरोग्याबाबत माहिती द्यावी. तसेच इन्स्टिट्यूशनल किंवा होम कॉरेन्टाइन सूचनेप्रमाणे रहावे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यकता नसताना घराबाहेर न पडण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. ते काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

बाहेरून आलेले रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) आहेत.  त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहे. ज्यांच्यावर उपचार चालू आहेत यांनी सुद्धा या ठिकाणच्या वैद्यकीय व्यवस्थेबद्दल आश्वस्त असावे.  कोरोनाबाधित तातडीने बरे होण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे,  मास्क अथवा कापडाने चेहरा झाकावा तसेच सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.