31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ कॉटन मार्केट भाजीबाजाराला भीषण आग

कॉटन मार्केट भाजीबाजाराला भीषण आग

0
640

नागपूर,दि.28ः शहरातील कॉटन मार्केट येथील भाजी बाजारात बुधवारच्या दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास आग लागली. लवकरच आगीने रौद्ररूप धारण करीत मार्के टच्या २१ दुकानांना कवेत घेतले. आग एवढी भीषण होती की, सर्वत्र धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच सात अग्निशमन बंबाच्या साहाय्याने तीन तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत ३४ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून १ कोटीची बचत करण्यात विभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले. सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
आगीचे भीषण स्वरुप बघता अग्निशमन विभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तात्काळ विभागाचे एकूण ७ बंब घटनास्थळी पोहचते झाले. यात गंजीपेठ, कॉटन मार्केट, सिव्हिल, सक्करदरा, लकडगंज, त्रिमूर्तीनगर फायर स्टेशनच्या अग्निशमन बंबांचा समावेश होता. घटनास्थळी पोहचताच कर्मचार्‍यांनी आगीवर पाण्याचा मारा केला. तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यास कर्मचार्‍यांना यश आले. कॉटन मार्केट येथे ठोक भाजीबाजारात दलालांनी टिनशेडची दुकाने उभारलेली आहेत. येथे १५0 हून अधिक भाजी अडतिये आपला ठोक व्यापार करतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दररोज पहाटे ५ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत हा भाजीबाजार असतो. बाजार बंद झाल्यानंतर अचानक आग लागल्याने एकच धावपळ झाली. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात विभागाच्या कर्मचार्‍यांनी ही भीषण आग आटोक्यात आणली. आधीच कोरोनामुळे कॉटन मार्केट हे बंद होते. कसेबसे मार्केट सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर येथील भाजी विक्रेत्यांच्या दुकानांना आगीने कवेत घेतल्याने व्यापारांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरात उष्मा वाढत असून आगीच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे.