अकोला, दि.3- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांच्या खर्चाला शासनाने मर्यादा घालून दिल्या आहेत. तथापि, कोरोना महामारीच्या संकटातून धडा घेऊन जिल्ह्यात अधिकाधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधांच्या निर्मितीवर आपण भर देऊ या. त्यासाठी ग्रामीण ते शहरी अशा विविध भागांसाठी आरोग्य सुविधा निर्मितीचा मास्टर प्लॅन तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.
पालकमंत्री श्री. कडू यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्च विवरणाचा यंत्रणानिहाय आढावा घेतला. त्यात प्राधान्याने जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य विभाग या यंत्रणांचा आढावा त्यांनी घेतला. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे, सीसीआय चे अजयकुमार आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. कडू यांनी सांगितले, जिल्ह्यातील रुग्णालये ही अत्याधुनिक सुविधांनी युक्त करतानाच तेथील वातावरण प्रफुल्लित व प्रसन्न असावे यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे. रुग्णालयांच्या भिंती या बोलक्या करा. पावसाळ्याच्या दृष्टीने येणारे साथीच्या आजारांचे अनुमान लक्षात घेऊन तालुकास्तरापर्यंत जादा आरोग्य सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न करा. रुग्णालयांमधील स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था, देखभाल दुरुस्ती याबाबत अत्याधुनिक उपाययोजनांचा अवलंब करा, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच ज्या कामांना दिरंगाई झाली आहे अशा कामांचा आढावा घेऊन अहवाल द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेअंतर्गत शाळा, रुग्णालये आदींच्या बांधकामांचा आढावा घेण्यात आला.
शेतीमाल खरेदी प्रक्रियेचा आढावा
जिल्ह्यात कापूस, तूर, मका आणि हरभरा या पिकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्या सर्व शेतकऱ्यांकडील माल वेळेत खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेबाबतही कडू यांनी आढावा घेतला. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन यंत्रणेने शिल्लक मालाचे पंचनामे केले आहे. याबाबतही ज्या ज्या शेतकऱ्याच्या घरी पंचनामे झाले आहेत अशा शेतकऱ्यांकडील माल प्राधान्याने खरेदी करावा अशा सूचना कडू यांनी दिल्या.
कोविड केअर सेंटरची पाहणी
पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथे दाखल रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच तेथे प्रशासनाने केलेल्या सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, नोडल अधिकारी शेळके तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री कडू यांनी ज्या ज्या विभागांच्या समन्वयातून रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष विचारणा करुन त्यांच्या समोरच दाखल रुग्णांना विचारपूस करुन खात्री केली. यावेळी मनपाने दाखल केलेले रुग्ण, तसेच सौम्य लक्षणे असणारे रुग्ण, नमुने घेऊन अहवालांच्या प्रतिक्षेत असणारे रुग्ण यांसाठी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थांची पाहणी त्यांनी केली. रुग्णांना देण्यात येणारे पाणी, जेवण, भोजन गृह, तसेच त्यांच्या दैनंदिन स्वच्छतांची व्यवस्था याबाबतही पाहणी केली व रुग्णांकडून त्याची माहिती घेतली.





