27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता लॉकडाऊनच्या काळात सायबर संदर्भात ४५५ गुन्हे दाखल; २३९ लोकांना अटक

लॉकडाऊनच्या काळात सायबर संदर्भात ४५५ गुन्हे दाखल; २३९ लोकांना अटक

0
138

मुंबई, दि.४ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४५५ गुन्हे दाखल झाले असून २३९ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४५५ गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C आहेत) नोंद २ जून २०२० पर्यंत झाली आहे.  या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १८८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स,युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३९ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात करण्यात यश आले आहे .

जळगाव

जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३३ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर फिर्यादी हा कोरोनाग्रस्त रुग्ण आहे, अशा आशयाचा चुकीचा मजकूर असणारी पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे फिर्यादीचे स्वास्थ्य उत्तम असून देखील त्यास सदर पोस्टवरील मजकुरामुळे मानसिक त्रास दिला गेला.

ॲप डाऊनलोड करताना काळजी घ्यावी

सध्या इंटरनेटवर छोटे व्हीडिओज बनविण्यासाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत त्यात प्रामुख्याने टीकटॉकचा वापर केला जातो. पण टीकटॉक हे चायनानिर्मित ॲप असल्यामुळे ‘मित्रो’ नावाच्या दुसऱ्या एका ॲपला लोक पसंती देत आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात, बहुतांश नागरिक घरीच असल्याने, करमणुकीसाठी हे ॲप डाउनलोड करून त्यावर विडिओ बनवून ते सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करू इच्छिते कृपया हे ‘मित्रो’ ॲप डाऊनलोड करताना विचार करा व गरज असल्यासच डाउनलोड करा . हे ॲप डाऊनलोड केल्यावर ते वापरात आणण्यासाठी तुमच्या मोबाईल फोनच्या access ची परवानगी विचारते, पण या ॲप मधून तुमच्या फोन प्रोफाईलवरील सर्व माहिती कोणीही, access करून त्याचा गैरवापर करू शकते, हा संभाव्य धोका विशेष करून हॅकर्स व सायबर भामटे यांच्याकडून जास्त प्रमाणात आहे. तांत्रिकदृष्ट्या user privacy च्या बाबतीत हे ॲप अगदीच कुचकामी ठरते, तसेच या ॲपची कोणतीही privacy policy किंवा user policy नाही त्यामुळे या ॲपचा कोणीही व कसा ही वापर करू शकतो.

सदर ॲपची मालकी कोणाकडे आहे त्याबद्दल देखील अनेक मतप्रवाह आहेत व संशय असा आहे की एका पाकिस्तानी कंपनीने या ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या ॲपचा वापर शक्यतो टाळणे हेच हितकारक आहे. जर कोणत्या व्यक्तीस हे ॲप वापरायचेच असेल तर ते डाऊनलोड करून आपल्या मोबाईल फोनमधील privacy settings मध्ये योग्यतो बदल करूनच हे वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.