भंडारा, दि. 4 : – देशात दिल्ली व मुंबई सारख्या मोठया शहरामध्ये डेंग्युचे काही रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. भंडारा जिल्हयात आतापर्यंत डेंग्युचे 2 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यु सदृष्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जावून तपासणी व आवश्यक असल्यास उपचार सुरु करणे आवश्यक आहे.
डेंग्यु ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होते. डेंग्युचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या मादी डासामुळे होतो. या डासाच्या पायावर पाढरे पट्टे असल्याने त्यांना टायगर मस्कीटो म्हणतात. सदर डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामध्ये रांजणातील पाणी, सिमेंटच्या टाक्यातील पाणी, इमारतीवरील टाक्यातील पाणी, घराभोवतालच्या टाकावू वस्तु जसे- प्लॉस्टीकच्या बादल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंटया, निरुपयोगी टायर्स इत्यादी मध्ये साठलेले पाणी घरातील कुंडया, फुलदाण्या, कुलर्स इत्यादी मध्ये साठवलेले पाणी यांच्यात होते.
डेंग्युची चिन्हे व लक्षणे- तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलटया, मळमळ, अशक्तपणा, अंगावर लाल पुरळ, डोळयांच्या आतील बाजूस दुखणे, काही रुग्णांमध्ये नाकाद्वारे व तोंडाद्वारे रक्तस्त्राव होतो.
डेग्यु टाळण्यासाठी नागरिकांनी करावयाच्या उपाययोजना- पाणी साठयाचा सर्व भांडी, हौद, टाक्यांना घट्ट झाकणे बसवा. पाणी साठयाची सर्व भांडी आठवडयातून किमान एकदा रिकामे करुन घासून, पुसून कोरडी करुन पुन्हा वापरावी. आठवडयातून एक कोरडा दिवस पाळून घराच्या परिसरात निरुपयोगी वस्तुंचा साठा करु नये. डासापासून व्यक्तीगत संरक्षणासाठी झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. डासांना पिटाळण्याऱ्या मॅट, कॉईल, अगरबत्ती, मलम, यांचा वापर करावा. अंगपूर्ण झाकेल असे कपडे वापरुन घरांच्या दारे व खिडक्यांना जाळी लावावी.
नागरिकांनी डेंग्यु सदृष्य लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, रुगणालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात जावून उपचार करावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे.





