भंडारा,दि.12ः शहराच्या मध्यभागातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी असून जड वाहनांमुळे दररोज घडणार्या अपघातांत अनेकांचा मृत्यू होत असतो.जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हापरिषदेसह अन्य शासकीय कार्यालये याच रस्त्याला लागून असल्याने नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी खा. सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन नवीन बायपास रस्ता मंजूर करुन घेतला आहे. बायपास रस्त्याचे बांधकाम, भुसंपादन व अन्य कामांसाठी ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बायपास रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जात असल्याने सर्व जड व प्रवासी वाहतूक याच मार्गावरून होते. जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील अनेक कार्यालये याच मार्गावर आहेत. त्यावरून भरधाव जाणार्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. नागपूरहून निघालेला राष्ट्रीय महामार्ग ५३ (जुना क्र.६) चार पदरी असला तरी मुजबी ते पलाडीपर्यंतचा रस्ता दोन पदरी असल्यामुळे शहरवासियांना त्याचा काहीच फायदा होत नव्हता. उलट अपघाताची नेहमीच भिती असायची.
खा. सुनील मेंढे यांनी ही समस्या शासन दरबारी लावून धरली. त्यांच्या पुढाकाराने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन बायपास रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित मार्ग शहापूर, बेला वरून वळण घेऊन तीर्थक्षेत्र कोरंभी येथे वैनगंगेवर नवीन पूल बांधून गिरोला, भिलेवाडा मार्गावर चारपदरी रस्त्याला मिळणार आहे. जमीन संपादनासाठी भारत सरकार तर्फे राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या बायपास रस्त्याचे काम पूर्ण होताच सर्व प्रवासी व माल वाहतूक येथून वळवली जाईल.
या बायपास रस्त्याची लांबी १४ किलोमीटर असणार आहे. यासाठी ५६.८९ हे.आर. जमिन १३ गावांमधून संपादीत करायची आहे. आजीमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी येथील जमिनीचे संपादनाचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च ६१८.७५ कोटी रुपये असून भुसंपादन व युटीलीटी शिफ्टिींगसह ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे.
७३८ कोटींच्या भंडारा बायपास रस्त्याला मंजुरी
सहा पदरीकरणाचा १४ कि .मी. रस्ता : भूसंपादनाची प्रक्रि या सुरू





