नागपूर,दि.15 : महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आज मुख्यंत्र्यांची भेट घेणार होते, मात्र काही मुख्यमंत्र्याचे सासरे वारल्याने आजची ही भेट टळली आहे. आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मग अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नसल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्यानेही निर्णय प्रक्रियेवरुन नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याचे ऊर्जा मंत्री आणि गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जाणारे नेते नितीन राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नसल्याने नाराजी व्यक्त केली. नितीन राऊत म्हणाले, ‘राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही. काँग्रेसच्या बऱ्याच मंत्र्यांचा हा अनुभव आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी कळवणार आहे. काँग्रेसच्या काही आमदारांचीही नाराजी आहे’
काँग्रेस नेते-मुख्यमंत्र्यांची भेट पुढे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे वारल्याने काँग्रेस नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक रद्द झाली आहे. पुढील बैठकीबाबत नंतर कळविण्यात येईल, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काँग्रेसची नाराजी व्यक्त करणार आहेत.





