तिरोडा,दि.17ः तालुक्यातील बोरगाव येथे मद्यपी सासर्याने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून चक्क सुनेवर कुर्हाडीने
प्राणघातक हल्ला चढविला. या घटनेत आरोपीची सुन गंभीररित्या जखमी झाल्याची १५ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. प्रतिमा उके (३५) रा.बोरगाव असे जखमी महिलेचे नाव असून तिला गोंदिया येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बोरगाव येथील प्रतिमा उके (३५) ही महिला आपल्या १० वर्षीय मुलीसोबत राहते. प्रतिमा उके ही विधवा असून १० वर्षापूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. आरोपी दिनदयाल उके (६४) या प्रतिमा उके यांच्यासोबतच राहत असून दारूचा व्यसनी आहे.सोमवारला (दि.१५) रात्री ११.३० वाजता सुमारा प्रतिमा व तिची मुलगी विधी उके (१०) हे झोपी गेले असता
दिनदयाल याने दारूसाठी पैशाची मागणी केली. दरम्यान पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने कुर्हाडीने प्रतिमावर हल्ला चढविला.दरम्यान जवळच्या असलेल्या विधीने आरडाओरड केली असता बाजुलाच असणार्या तिच्या कुटूंबिय व नागरिकांनी धाव घेवून तिला वाचविले. दरम्यान जखमी प्रतिमाला उपचारासाठी वडेगाव येथील आरोग्य केंद्रात
दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने सिटीस्कॅन करून तिला गोंदिया येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेतील आरोपीला अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी
परिसरातील नागरिकांनी केली आहे.





