गडचिरोली,दि.19ःमुसळधार कोसळणार्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी झाडाखाली असलेल्या जनावरांच्या अंगावर वीज कोसळल्याने तब्बल ११ जनावरे ठार झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरांतर्गत येत असलेल्या झाडापापडा ग्रामपंचायत हद्दीतील रूपीनगट्टा येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात ६ गायी, ४ गोरे व एका बैलाचा समावेश आहे. जनावरांच्या मृत्यूमुळे पशुपालकांचे २ लाख ७ लाखांचे नुकसान झाले. ऐन शेतीच्या हंगामात निसर्गाच्या प्रकोचे शेतकर्यांचे जनावर मृत्यू झाल्याने शेतकर्यांसमोर मोठे संकट कोसळले आहे.
मंगळवार १६ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. पेंढरी परिसरांतर्गत येत असलेल्या झाडापापडा हद्दीतील रूपीनगट्टा येथेही विजेच्या रुद्रअवतारासह पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे गावात इतरत्र भटकणारी जनावरे पावसापासून बचाव करण्यासाठी गावाच्या आतील भागात पिंपळाच्या झाडाने आच्छीत असलेल्या मोहफुलाच्या झाडाखाली एकत्र झाली होती. अचानक मेघगर्जनेसह झाडावर वज्राघात झाल्याने झाडाखाली गुरांच्या कळपातील तब्बल ११ जनावरे जागीच ठार झाली.
यामध्ये देवराव सोमा पदा यांची १ गाय मृत्य पावल्याने त्यांचे २४ हजार ५00 रूपयांचे नुकसान झाले. धडेराम विरा उसेंडी यांचे २ गोरे, किंमत ३४ हजार, सनकाय दुगरू कोराम यांची १ गाय किंमत २३ हजार, शामवती सुखराम पदा यांचा १ बैल किंमत २८ हजार ५00 रूपये, संपत नवीन वैद्य यांच्या ३ गायी किंमत ४९ हजार रूपये, भगनीबाई टिल्लू वड्डे यांची १ गाय किंमत १७ हजार, गांडो जोगी वड्डे यांची १ गाय, १ गोरा अंदाजे किंमत ३१ हजार असा एकूण २ लाख १७ हजार रूपयांचे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.बुधवार १७ जून रोजी सकाळी ११ वाजता पशुधन विभाग तसेच महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून मृत जनावरांचा पंचनामा केला. यावेळी तलाठी एस. एम. काटेंगे, पशू प्रतिबंधक डी. एन. रामटेके, प्रतिबंधक परिचर टी. एस. गडपायले, झाडापापडा ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रियंका नाईक, उपसरपंच धर्मेंद पोटवार, अमित उसेंडी, सुखदेव पदा, बारखू उसेंडी, कमलेश नाईक, सगराम हिडको आदी उपस्थित होते.





