खेमेंद्र कटरे,गोंदिया–राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पूर्व विदर्भाचा विचार केल्यास पूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकिर्दीत तिरखेडी,कामठा,फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवान, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत. त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डांची रचना आली.परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले.
गावात असलेले वाडे किंवा पाटलांचे बंगले म्हणजे जुन्या काळातील वैभवाचे दर्शन करविणारे रूप आहेत. मात्र कालौघाने या वास्तूंना भग्न रूप आले आहे.पुर्व विदर्भासह बालाघाट व सिवनी जिल्ह्यांचा विचार केल्यास सध्याच्या घडीला सर्वाधिक वाडे हे गोंदिया जिल्ह्यात बघावयास मिळतात.या वाड्यांच्या बाबतीत आजही जनतेमध्ये एक आपुलकी असून भव्यदिव्य असलेले हे वाडे खरंच सांस्कृतिक वारसा म्हणून जपणे योग्य आहे.या वाड्यांच्या अनुषंगाने विचार करणे गरजेचे झाले आहे.
जुना सीपीएन्ड बेरारचा भाग म्हणजे आजचा पूर्व विदर्भासह मध्यप्रदेशातील बालाघाट,सिवणी या जिल्ह्यांचाही समावेश होतो. या भागात इंग्रजांच्या काळात जमीनदारी आणि महाजनकी या दोन पदव्यांमुळे कुणबी,पोवार,लोधी,कोहळी या समाजातील काही लोकांना पद व प्रतिष्ठा मिळाली. त्या पद प्रतिष्ठेच्या मान्यतेसाठी व आपला एक रुबाब सर्वसामान्य नागरिकांवर असावा त्यातच आपले पण आणि आपल्या घराची एक विशिष्ट ओळख वेगळी छाप देवून जाणारी असावी. या दृष्टीने भव्य-दिव्य असे १२ बलुतेदारांच्या कलाकृती व नक्षीकामाने मातीचे वाडे तयार झाले. हे मातीचे वाडे आज बांधकामातील उत्कृष्ट नमुन्याचे एक वेगळी छाप दाखविणारे ठरले असून पुरातणी या वाड्यांना वाचविणे गरजेचे झालेले आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास ४ मजली असलेला तिरखेडी येथील वाडा आणि डोंगरगाव सावली येथील डोये कुटुंबीयांचा वाडा वेगळेपण दाखविणारा आहे.पोवार,लोधी,कोहळी व कुणबी समाजात ज्यांना जमीनदारी व महाजनकी मिळाली त्या तिरखेडी, बटाणा, कामठा, डोंगरगाव सावली,जामखारी,फुलचूर, हिरडामाली, पाथरी,बोरगाव,मलपुरी, सतोना,सौंदडा,नागरा येथील लिल्हारेंचा वाडा, सावंगी, सातलवाडा,राजेगाव, पाथरी,सिहोरा,आमगावचा बहेकार वाडा,वडद,फुक्कीमेठा,बोरकन्हार,अंजोरा,कोहळी समाजातील मान्यवरांना मालगुजार ही पदवी मिळालेली होती.त्यामध्ये नवेगावबांधचे सीताराम पाटील डोंगरवार,खोडशिवनीचे गणपतराव पाटील मालगुजार,चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावचे बालाजी पाटील बोरकर यांचेही भव्यदिव्य असे वाडे होते.आजही अनेक गावामध्ये मोठ्या डौलाने उभे असलेले हे वाडे मोडकळीस येऊ लागले आहेत. त्या मोडकळीस व जिर्णावस्थेतील वाड्यांना नवसंजीवनीच गरज आहे. ज्यामुळे एक इतिहास नव्या पिढीला त्या वाड्यांच्या माध्यमातून दाखविता येऊ शकते. पूर्व विदर्भातील या जिल्ह्यामध्ये असलेल्या वाड्यांची संरचना बघितल्यास झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा वाडा, नागपुरातील बुटीवाडा यासह पुरंदरमध्ये ज्या वाड्यात संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या वाड्याला बघितल्यावर आपण आपल्या भागातीलच वाड्यांची पाहणी करतोय की काय असा आत्मविश्वास निर्माण होतो.विशेष म्हणजे पूर्व विदर्भातीलच वर्धा जिल्ह्यात सुद्धा लोधी समाजाला मिळालेल्या जमिदांरीमुळे तिथेही वाडा बघावयास मिळतो.




