गडचिरोली दि.22: समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा मधील वर्ग १ते ८ पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी व एससी, एसटी, एनटी/ व्हीजे,व बीपीएल प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो.hण ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी मात्र गणवेशापासून वंचित राहत असल्याने या विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देत करण्यात आली. एकाच बाकावर बसणाऱ्या विविध प्रवर्गातील मुलांमधील गणवेशामुळे निर्माण होणारी दरी व न्यूनगंडता टाळण्यासाठी वर्ग १ ते ८ पर्यंतच्या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा गणवेश देण्यात यावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व शिक्षण सभापती मनोहर पाटील पोरेटी यांची आज भेट निवेदन सादर केले.त्यावेळी जिल्हा परिषद शाळांमधील १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे ठोस आश्वासन दिले.जिल्हा परिषद शाळांमध्ये बहुतांश गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. यामध्ये सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो, त्यांच्याकडे गणवेश खरेदीसाठी पैसे नसतात.यंदा कोरोणामुळे सरकारी तिजोरीवर परिणाम झाला आहे जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या अनुदानामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. हे जरी असले तरी विद्यार्थ्यांना प्राथमिकता देऊन ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी निश्चित आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व शिक्षण सभापती मनोहर पाटील पोरेटी यांनी शिष्टमंडळाला दिले.निवेदन देतांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, संजय चरडूके,
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी. कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर उपस्थित होते.





