सालेकसा,दि.24ः-शेतीचे नियोजन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवणे. यासाठी विविध विभागाच्या मार्फत पावसाची नोंद ठेवून त्याप्रमाणे पुढील नियोजन केले जाते. परंतु सालेकसा तालुक्यात वेगळे चित्र बघायला मिळत आहे. तालुकास्तरावरील विविध विभागांच्या मार्फत बसवण्यात आलेले पर्जन्यमापकाची चाचपणी केली असता एकही पर्जन्यमापक योग्य परिस्थितीत आढळून आलेला नसल्याने एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पर्जन्यमापकाची तपासणी करून ते योग्य स्थितीत असल्याची खात्री केली जाते. असे असतानाही त्यातील एकही पर्जन्यमापक योग्य स्थितीत नसून त्यातून पावसाच्या पाण्याची नोंद केली जाऊ शकत नाही असे आढळून आले आहे. याबाबत वेगवेगळ्या विभागांना चौकशी केली असता सगळ्यांनी ‘तो मी नव्हे’ प्रकारचे उत्तर देत एकमेकांकडे बोट दाखवण्याचे कार्य केले जात आहेत. शेतकऱ्यांचा सर्वाधिक जवळचा विभाग असलेला कृषी विभागही उडवाउडवीचे उत्तर देत मंडळ अधिकाऱ्यांकडे व राजस्व विभागाकडे बोट दाखवत असतांना दिसत आहे. तर तहसील कडे या पर्जन्यमापक बाबत चौकशी केली असता कृषी विभागाकडे व पाटबंधारे विभागाकडे जबाबदारी असल्याचे उत्तर मिळत आहे. पाटबंधारे विभागाचे पर्जन्यमापक ताळेबंद करून ठेवले असून कुलूपांना अशाप्रकारे गंज लागला आहे की त्यात त्याची अस्सल चावी सुद्धा काम करणार नाही. यावरून तालुका प्रशासन पर्जन्यमापक बाबत किती बेफिकीर आहे हे दिसून येतं. तालुक्यातील पर्जन्यमानाची आतापर्यंतची नोंदी या सर्व कागदावरच घेतल्या असाव्यात असा अंदाज वर्तविला जात आहे. ज्या अर्थी पर्जन्यमापक नादुरुस्त आहे तर पर्जन्यमानाच्या नोंदी येतात कुठून असा खडा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
सदर बाब महसूल यंत्रणेच्या कार्यकक्षेत येत असल्याने आपण तहसीलदार यांच्याशी चर्चा करावी.
– दुधाने तालुका कृषी अधिकारी सालेकसा
मोजमापसाठी यंत्र नसल्यास संबंधित विभागाने तसे अहवाल पाठवावे त्यावर कार्यवाही करू परंतु अद्याप अशी कोणतीही तक्रार कोणत्याही विभागामार्फत आलेली नाही.
– ए. बि. भुरे, नायब तहसीलदार, सालेकसा





