भंडारा,दि.27 : धानाच्या तणसापासून बायोइथेनॉल तयार करण्याचा मकरधोकडा येथील प्रस्तावित प्रकल्प इतरत्र हलविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री, विधानसभाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.सन 2018 मध्ये तणसापासून बायोइथेनॉल तयार करण्याच्या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. प्रकल्पाकरिता जागा उपलब्ध होती. मात्र हा प्रकल्प साकोली विधानसभा मतदारसंघात नेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.भंडारा तालुक्यातील मकरधोकडा येथील 47 हे. आर. जमीन एमआयडीसीला उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यामुळे प्रकल्पाकरिता जागा उपलब्ध होती. मात्र हा प्रकल्प साकोली विधानसभा मतदारसंघात नेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे भंडारा तालुक्यातील जनतेवर अन्याय होईल.भंडारा विधानसभा मतदारसंघातील हजारो बेरोजगार तरुणांना या प्रकल्पामुळे रोजगार मिळणार आहे. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. परंतु भंडारा मतदारसंघातील प्रकल्प हिरावून घेऊन येथील शेतकरी, शेतमजूर, तरुण, बेरोजगारांवर अन्याय करण्याची भूमिका कुणी घेतली; तर रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशारा श्री. भोंडेकर यांनी दिला.या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पाला गती देण्याची मागणी करणार असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख ऍड. रवी वाढई, अनिल गायधने, कामगार आघाडीचे श्रीकांत पंचबुद्धे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशा गायधने, सविता तुरकर, शालिनी नागदेवे आदी उपस्थित होते.





