भंडारा,दि.27 :- शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याकरीता टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर एफआरआर दाखल करण्याचे गृह मंत्र्यांचे आदेश आहेत. त्यामुळे कर्ज वाटपाबाबत कोणतेही कारण चालणार नाही. खरीप हंगाम कालावधीकरीता सर्व पात्र शेतकऱ्यांना बँकांनी कृषि पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे.प्रदीपचंद्रन यांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना दिले. बँकांना नेमून दिलेले उद्दिष्टे पूर्ण करण्याकरीता उपाय योजना करण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुलभ कर्ज वाटप अभियान व तातडीने पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक कुंभलवार, नाबार्डचे संदीप देवगीरकर, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, सर्व बँकांचे नोडल अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कृषि पीककर्ज पुरवठा सुलभरित्या होण्याकरीता 10 जुलै पर्यंत मुदत देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सर्व तालुक्यात पीककर्ज शिबीर व मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून तहसिलदार व उपविभागीय अधिकारी पीक कर्ज शिबीरास सहकार्य करतील. पालकत्र्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने समजून घेवून त्यांना सहकार्य करा. बँकांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट समाधानकारक नाही, त्यामध्ये वाढ करा. लाभार्थ्यांच्या याद्या तयार असून त्यानुसार या कामास गती द्यावी, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील बँकांनी पावसाळयाचे दिवस व हंगामाची जाणीव ठेवुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज देवून उद्दिष्ट पूर्ण करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हयामध्ये महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रियकृत बँक, ग्रामीण बँक व खाजगी बँकांनी निकषाप्रमाणे 34 हजार 600 पात्र शेतकऱ्यांची खाती शासन पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी विशिष्ट क्रमांकासह आधार प्रमाणिकरणासाठी 31 हजार 407 लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना या हंगामात पीककर्ज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने संबंधित गावाला सलग्न राष्ट्रियकृत बँका, ग्रामीण बँका, खाजगी बँका व जिल्हा मध्यवती सहकारी बँकांच्या शाखांना संपर्क साधून कृषी कर्ज उपलब्ध करुन घ्यावे. या संबंधाने काही अडचणी उदभवल्यास संबंधीत तालुक्यातील तहसिलदार व सहाय्यक निबंधक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, केसीसी सेचुरेशन, पीएम किसान योजना , पशुपालन, मत्स्यव्यवसाय आदींचा आढावा घेण्यात आला.





