31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ वाशिम जिल्ह्यात आधारभूत किंमतीने यंदा विक्रमी २ लक्ष ६९ हजार क्विंटल कापूस...

वाशिम जिल्ह्यात आधारभूत किंमतीने यंदा विक्रमी २ लक्ष ६९ हजार क्विंटल कापूस खरेदी

0
154

blank

वाशिम, दि. २५ : जिल्ह्यात यंदा शासकीय खरेदी केंद्रांवर विक्रमी २ लक्ष ६९ हजार ७०५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन आणि यंदा लवकर सुरु झालेल्या पावसाळ्याच्या काळातही यंदा तुलनेने अधिक कापूस खरेदी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना सुमारे १३६ कोटी ६ लक्ष रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत मंगरूळपीर आणि अनसिंग (ता. वाशिम) येथे कापूस खरेदी केंद्र सुरुवात करण्यात आले, तर कापूस पणन महासंघाच्यावतीने सुरुवातीला कारंजा लाड आणि मानोरा येथे कापूस खरेदी सुरु करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी धनज बु. येथेही नवीन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कापूस पणन महासंघाकडे पाठपुरावा केल्यानंतर महासंघाच्यावतीने धनज बु. येथे कापूस खरेदी सुरु करण्यात आली.

लॉकडाऊन काळात कापूस खरेदी सुरळीतपणे सुरु राहावी, यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वेळोवेळी आढावा घेवून जिल्हा प्रशासन, कापूस पणन महासंघाचे अधिकारी यांना सूचना केल्या. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनीही लॉकडाऊन काळात कापूस खरेदी केंद्र सुरु ठेवण्याच्या अनुषंगाने सीसीआय व कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी यांची बैठक घेवून आवश्यक सूचना दिल्या. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कापसाचे बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी झाले, त्यामुळे शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्रांकडे अधिक होता. लॉकडाऊन काळात सुमारे ८७ हजार ३९१ क्विंटल कापसाची खरेदी झाली.

यावर्षी सीसीआयच्या मंगरूळपीर कापूस खरेदी केंद्रावर १ लाख ७६ क्विंटल कापसाची तर अनसिंग येथील कापूस खरेदी केंद्रावर ५९ हजार ९६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. कापूस पणन महासंघाच्या कारंजा लाड येथील कापूस खरेदी केंद्रावर ८१ हजार ८२७ क्विंटल, मानोरा येथील केंद्रावर २६ हजार ५२९ क्विंटल आणि कारंजा लाड तालुक्यातील धनज बु. येथील केंद्रावर २ हजार १७७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. ‘सीसीआय’मार्फत सुमारे ८५ कोटी ९० लक्ष रुपये आणि कापूस पणन महासंघाच्यावतीने सुमारे ५० कोटी १६ लक्ष रुपये असे एकूण सुमारे १३६ कोटी ६ लक्ष रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रवी गडेकर यांनी दिली.

blank