
गोंदिया,दि.14ः-गोंदिया जिल्हापरिषदेतील काही सेवानिवृत्त अधिकार्याना मोह सुटेना अशी अवस्था निर्माण झाली असून सेवानिवृत्तीनंतरही जिल्हापरिषदेतील महत्वपुर्ण कागदपत्रच नव्हे तर रद्द झालेले आरोग्य विभागातील 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विद्युतीकरणाच्या ई टेंडर प्रकिया पार पाडण्यासाठी काही तथाकथीत कामाला लागले आहेत.विशेष गोंदिया जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर अशा सेवानिवृत्त अधिकार्यामुळे प्रभाव पडत असल्याने शासनाने त्यांना गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करुन जिल्हा परिषद वाचवावे अशी हाक सरकारकडे होऊ लागली आहे.31मार्चला सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकार्याच्या स्वाक्षरीने एप्रिल महिन्यात आरोग्य केंद्रातील विद्युतीकरणाचे ई टेंडर बिड ओपन करण्याचा प्रताप जिल्हा परिषदेत घडला आहे.विशेष म्हणजे ज्या दिवशी व्यक्ती सेवानिवृत्त होतो त्यानंतर त्याचा काहीही संबध राहत नाही,परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या 14 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील विद्युतीकरणाची कामे आपल्याच शिलेदारांना मिळावी यासाठी काही अधिकार्यांवर दबाव घालून ईटेंडर ओपन करण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचे बोलले जाते,तर काहींच्या मते त्या टेंडर प्रकियेचे काम रद्द करण्यात आल्यानंतरही ती कामांना मंजुरी देण्यासाठी हट्ट का अशा चर्चा कंत्राटदार वर्गात सुरु झालेल्या आहेत.एकतर गेल्या महिन्याभरापासून पुर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुध्दा जिल्हा परिषदेतील गैरकारभारावर आळा घालण्यापेक्षा आपण हे केले ते केले सांगण्यातच व्यस्त झाले असून जिल्हा परिषदेचा रेकार्ड मात्र बाहेर कसा चालला याचा शोध घ्यायलाही त्यांना वेळ नसल्याने जिल्हा परिषद वार्यावर म्हणायची वेळ आली आहे.




