31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ नवेगावबांध येथील प्रस्तावित पक्षी अभयारण्याला ग्रामपंचायतसह ग्रामस्थांचा विरोध

नवेगावबांध येथील प्रस्तावित पक्षी अभयारण्याला ग्रामपंचायतसह ग्रामस्थांचा विरोध

0
2243

blank

सडक अर्जुनी,दि.02(भामा चुर्हे)– अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पक्षी अभयारण्य निर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.मात्र या पक्षी अभयारण्याला नवेगावबांध व परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. नवेगावबांध ग्रामपंचायतने या प्रस्तावित पक्षी अभयारण्याला विरोध दर्शविणारी पत्र आज 2 सप्टेंबरला उपवनसंरक्षक गोंदिया यांना लिहून विरोध दर्शविल्याची माहिती सरपंच अनिरुद्ध शहरे यांनी दिली आहे.सोबतच ज्याठिकाणी पक्षी अभयारण्य करायचे आहे,तिथल्या ग्रामपंचायतीला व तेथील स्थानिक पर्यावरण प्रेमींना न विचारता ज्यांच्या या भागाशी संबध नाही,अशांना विचारणे सुध्दा चुकिचे असल्याचे म्हटले आहे. साडेचारशे वर्षांपूर्वी नवेगावबांध जलाशयाची निर्मिती पिण्याचे पाणी व शेतीसाठी सिंचन यासाठी येथील मालगुजार कोलु उर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी केली आहे. नवेगावबांधसह पाच गावाचा निस्तार हक्क येथील तलावावर व परिसरातील दुचंद जंगलावर आहे. या जलाशयाशी संबंधित जे घटक आहेत, त्यांचे निस्तार हक्क कायम राहावेत,असे ग्रामस्थांना वाटते. त्यामुळे या पक्षी अभयारण्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. पक्षी अभयारण्य झाले तर, दूचंद जंगल, सिंचन ,पिण्याचे पाणी ,गुरे चराई ,मासेमारी आधी हक्कांवर बंधने येतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पक्षी अभयारण्याची निर्मिती झाली तर या जलाशयात तलाव परिसरातील तेरा गावातील हजारो कुटुंब मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. नवेगावबांध जलाशय तथा सध्याचे पर्यटन संकुल परिसर जर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.तर या ठिकाणी वन्य प्राणी संरक्षण अधिनियम 1972 च्या तरतुदी लागू होतील. त्यामुळे दूचंद जंगल ,वन, गुरे चराई, मासेमारी शेतीचे सिंचन आदि हक्कांवर गदा येणार, त्यामुळे येथील पक्षी अभयारण्य निर्मितीला स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. काही बाहेरच्या लोकांना हाताशी धरून मागील दाराने पक्षी अभयारण्य घोषित करण्याचा डाव आखला जात आहे,हे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया नवेगावबांध ग्रामपंचायत सरपंच अनिरुद्ध शहर यांनी व्यक्त केली आहे.पक्षी अभयारण्याला येथील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम मेश्राम यांनीही विरोध केला आहे. नवेगाव बांध येथील सर्व गाई-ढोरं हे चराईसाठी पर्यटन संकुल परिसरातील वनात नेले जातात, उद्या अभयारण्य घोषित झाले, तर गुरे चराईवर बंधने येतील, त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचा सुद्धा या अभयारण्याला विरोध अशी प्रतिक्रिया शेतकरी रामदास बोरकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव येथे पक्षी अभयारण्य निर्मिती करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यासंदर्भात गोंदिया येथे 3 सप्टेंबर बुधवार ला एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्य संरक्षक प्रादेशिक नागपूर यांनी स्थानिक लोकांचे जनमत व लोकप्रतिनिधी यांचेशी चर्चा करून या अभयारण्यासाठी किती क्षेत्र उपलब्ध होऊ शकेल याबाबत चर्चा करून, त्याबाबतची चाचपणी करून सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करण्यास उपवनसंरक्षक गोंदिया यांना सुचित केले आहे.
पक्षी अभयारण्य निर्मितीसाठी ची बैठक गोंदिया येथे तीन सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु या बैठकीला आपणास बोलावण्यात आले नाही. आमच्या गावचा निर्णय बाहेरचे लोक कसे घेतील? ग्रामपंचायतीच्या ना हरकती शिवाय पक्षी अभयारण्याचा प्रस्ताव वन विभागाने शासनाला पाठवू नये. कुठल्याही परिस्थितीत नवेगावबांध जलाशय व जंगल यावरील गावकऱ्यांचे निस्तार हक्क बाधित ठेवण्याचा प्रयत्न आपण करू.

blank