33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पुरामुळे १८00 एकर शेतीचे नुकसान-खा.नेते

पुरामुळे १८00 एकर शेतीचे नुकसान-खा.नेते

0
404

blank

अहेरी,दि.06ः तालुक्यातील देवलमरी परिसरात पुरामुळे सोयाबीन व कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. काल ४ सप्टेंबर रोजी खासदार अशोक नेते यांनी अहेरी तालुक्याचा दौरा करून देवलमरी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ सर्व्हे करण्यात यावे, असे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना दिले.
यावेळी भाजपचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप कोरेत, तालुका महामंत्री पोशालू चुधरी, अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी देवलमरी परिसरातील अबनपल्ली, इंदाराम, सॅन्ड्रा, देवलमरी इत्यादी गावातील शेतीची पाहणी केली असता सोयाबीन व कपाशी पीक पूर्णत: नष्ट झाल्याचे दिसून आले. प्राणहिता नदीच्या पुराचे पाणी शेतात भरून राहिल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत तात्काळ मिळण्यासाठी अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यानी तहसीलदाराना दिल्या. तसेच शेतकर्‍यांना हेक्टरी ५0 हजारांची मदत मिळण्यासाठी आपण शासनाकडे मागणी करणार असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले.
त्यानंतर खा. नेते यांनी नुकसानग्रस्त शेतीचा आढावा घेतला असता अहेरी तालुक्यात १७५0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून तालुक्यातील ९0 टक्के पीक पूर्णत: नष्ट झाले आहे. तसेच अहेरी तालुक्यात २३ घरांची पडझड झालेली असून त्याचे सर्वेक्षण झालेले आहे. तसेच शेतकर्‍यांचे २५0 हेक्टर शेतीचे सर्वेक्षण पूर्ण झालेले असून उर्वरित शेतीचे सर्व्हेलवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.
शेतकर्‍यांचे सर्वेक्षण त्वरित पूर्ण करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई तत्काळ मिळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अधिकार्‍यांना दिले. शासन स्तरावर पाठपुरावा करून पुरामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून १0 हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिली.

blank