वैनगंगा नदीत युवकयुवतीने घेतली उडी

0
541

गडचिरोली,दि.23 : गडचिरोली येथील प्रेमीयुगुलाने गडचिरोली-मूल मार्गावरील वैनगंगा नदीपुलावरून आज शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उडी घेतल्याची घटना घडली. ते दोघेही बेपत्ता असून शोध मोहिम सुरुच आहे. प्रतीक राजू गिरडकर (१८) रामनगर, गडचिरोली व कांचन अरविंद नागोसे (१७) वन विभाग कॉलनी गडचिरोली अशी नदीत उडी घेतलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. प्रतीक व कांचन हे दोघेही एकमेकांवर प्रेम करीत होते. ही बाब कांचनच्या आईवडीलांना माहीत झाल्यानंतर कांचनचे तिच्या आईवडीलांसोबत शुक्रवारी रात्री भांडण झाले. त्यामुळे कांचन मानसिक तणावात येऊन पहाटे ४ वाजताच्या सुमारास घरून निघून गेली. प्रतीकच्या दुचाकीवर बसून दोघेही नदीपुलाकडे गेले. सकाळी ८ वाजताच्या सुमारास प्रतीकच्या आईने प्रतीकला फोन केला असता, अर्ध्या तासामध्ये आपण परत येत असल्याचे सांगितले. मात्र ९ वाजता प्रतीक व कांचनने वैनगंगा नदीपुलावरून पाण्यात उडी घेतली. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी दोघांनाही उडी घेतांना बघितले. याबाबतची माहिती गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली पोलीस स्टेशनला देण्यात आली. दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बोटीने शोधकार्य सुरू केले. मात्र वृत्त लिहीपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.