लाच प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोघांना अटक

0
108

अमरावती- बार मालकाला कारवाईची भीती दाखवून लाच मागणार्‍या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकार्‍यासह खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी रात्री 11 वाजता अटक केली.
संजय केवट (दुय्यम निरीक्षक), प्रशांत सांगोले (खाजगी इसम) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. तक्रारदाराच्या वडीलाच्या नावाने बार आहे. या बार मधील स्टॉक रजीस्टरमध्ये तफावत असल्यचे दाखवून कारवाई करण्यात येईल आणि कारवाई टाळायची असेल तर 50 हजाराची लाच देण्याची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली होती. सदर प्रकाराची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची शहानिशा करण्यात आली.
पडताळणीत तडजोडीअंती 40 हजाराची लाच मागण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ठरल्यानुसार गुरूवारी रात्री बसस्थानक मार्गावरील मलकापूर बँकेसमोर सापळा लावण्यात आला. दुय्यम निरीक्षक संजय केवट यांच्यासाठी लाच घेताना प्रशांत सांगोले याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर केवट यांनाही ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक संतोष इंगळे, सतीश उमरे, सुनील वर्‍हाडे, युवराज राठोड, महेंद्र साखरे यांच्यासह इतरांनी केली.