क्षुल्लक घटनेत हेटी पालेवाडा येथे युवकाची हत्या 

0
70

रस्त्याच्या मधोमध ठेवले होते झाड, झाड हटविण्यासाठी झाला वाद,

गोरेगाव  : गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या ग्राम हेटी-पालेवाडा येथे आपसी वैमनस्यातून एका युवकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. यात ये-जा करण्याच्या रस्त्यावर केळीचे झाड कापून ठेवण्यात आले होते. हे झाड हटविण्याच्या कारणावरून वाद झाले. याच वादातून युवकाची हत्या झाल्याचे सांगण्यात आले. ही हत्या रविवार, 12 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, ग्राम हेटी-पालेवाडा येथील ओंकार (55) व कृष्णा (25) यांनी केळीचे झाड कापून येण्याजाण्याच्या रस्त्यावर शुक्रवार, 10 सप्टेंबरच्या रात्री ठेवले होते. यावर फिर्यादी वैभव करंडे नावाच्या युवकाने त्यांना ते झाड रस्त्यावरून हटवून बाजूला ठेवण्यास सांगितले. परंतु आरोपींनी तसे करण्यास मनाई केली. त्यामुळे फिर्यादी स्वतः ते झाड हटवू लागला. त्यामुळे भांडण झाले. दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर वार करून जखमी केले.

हे भांडण व मारहाणीच्या घटनेसंदर्भात शनिवार, 11 सप्टेंबर रोजी फिर्यादी वैभव करंडे (वय 23) रा. हेटी-पालेवाडा याने दोन्ही आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यात पोलिसांनी कलम 324, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसात तक्रार केल्याचा राग आरोपींच्या मनात होता. आरोपींना मारण्यासाठी वैभव त्यांच्या घरी गेला होता. दरम्यान आरोपी ओंकार याने कुर्‍हाडीने वैभवच्या गळ्यावर वार केले. त्यामुळे अत्यधिक रक्तस्त्राव होवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 12 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजता घडली.

गोरेगाव तालुक्यातील हेटी पालेवाडा दोन दिवसापूर्वी झालेल्या छुल्लक वादाने उग्र रूप धारण केले. वैभव सुनील करंडे (वय 23) रा. हेटी-पालेवाडा याच्या गळ्यावर कुर्‍हाडीने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहचून तपासाला सुरुवात केली आहे. तसेच यातील आरोपी ओंमकार चैतराम मेश्राम याला जेरबंद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे व सहायक पोलीस निरीक्षक गोसावी घटनास्थळी पोहचले. या प्रकरणात गोरेगाव पोलिसांनी फिर्यादी सुनील करंडे (वय 55) रा. हेटी-पालेवाडा यांच्या तक्रारीवरून आरोपी ओंकार विरुद्ध भादंविच्या कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.