तलाठ्याकडूनच भरावी ई- पीक पाहणी;टेमनी येथील शेतकऱ्यांची मागणी

0
122

गोंदिया,दि.13(देवेंद्र रामटेके)-सध्या शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला ई- पीक पाहणी हा प्रकल्प युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे.मात्र या प्रकल्पांतर्गत मोबाईल ॲप मध्ये माहिती अपलोड करतांनी शेतकऱ्यांना मोठी अडचण येत असल्याने सदर अपलोड ची कामे ही तलाठ्याकडूनच करवून घेण्यात यावी, अशी मागणी गोंदिया तालुक्यातील टेमनी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांना विविध योजनांचा सरळ लाभ पुरविण्यासाठी शासनाने त्यांच्या शेतातील लागवड केलेल्या पिकांची माहिती शासन दरबारी उपलब्ध व्हावी म्हणून ई -पीक पाहणी प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाईल ॲप च्या माध्यमातून अपलोड करणे गरजेचे आहे. मात्र हे करीत असताना अनेक शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नसल्यामुळे त्यांना नोंदणी कशी करावी असा प्रश्न पडला आहे. त्यातच अनेक गावात मोबाईल नेटवर्क ची मोठे समस्या आहे त्यामुळे माहिती अपलोड करतांनी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याव्यतिरिक्त अनेक कुटुंबातील सातबारा एकत्र आहे परंतु जमिनीची आपसात कौटुंबिक हिस्से वाटणी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक हिस्सेदाराने माहिती कशी भरावी असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.अनेक शेतकरी गरीब असून त्यांच्या कडे अँड्रॉइड फोन देखील उपलब्ध नाही. या व्यतिरिक्त तलाठयाकडे सर्वच सोई सुविधा उपलब्ध असून शेतीतील सर्व माहीत त्याच्या कडे उपलब्ध आहेत त्यामुळे सदर ई-पिक माहिती त्यांना स्वतःभरणे सोपस्कार होणार आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या विचारात घेता शासनाने ही इ-पीक संबंधाची माहिती तलाठ्याकडूनच भरून घ्यावी व शेतकऱ्यांना यातून मोकळे करावे अशी मागणी टेमनी येथील शेतकरी ओमप्रकाश पटले, तिलकचंद पटले, मनीराम पंडेले, योगराज पटले,जीवन दमाहे, योगराज नागपुरे, हिरासिंग दमाहे, लक्ष्मीचंद नागपुरे, यांनी शासनाकडे केली आहे.

शिवलाल नेवारे, शेतकरी तथा उपसरपंच ग्रामपंचायत टेमणी. खरोखरच शासनाने विचारलेली माहिती ही मोठ्या स्वरूपाची आहे. त्यामुळे ती अपलोड करताना शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे. शासनाने यातून शेतकऱ्यांना सोपे होईल असे मार्ग काढावे.

कु. एम. आर.ठकरेले तलाठी चुलोद.
आम्ही प्रत्यक्षरीत्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सर्वोत्तपरी मदत करीत आहोत. सदर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचाच फायदा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी माहिती भरून आपला सहभाग नोंदवावा.जर कुणाला अडचण भासली तर त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.