भाजप नेत्यावर तडीपारीची कारवाई

0
97

मोहाडी- नुकताच कार्यकाळ संपलेल्या भाजपच्या माजी मोहाडी पंचायत समिती सभापती यांचे पती व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी विश्‍वनाथ बांडेबुचे यांच्यावर तडीपाराची कारवाई करण्यात आली असून त्यांना भंडारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
विश्‍वनाथ बांडेबुचे यांच्यावर अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर हल्ला करून जखमी करण्याचा व बोगस रॉयल्टी बनविण्याचाही बांडेबुचे यांच्यावर गुन्हा नोंद आहे. मोहाडी पोलिसांनी विश्‍वनाथ बांडेबुचेविरुद्ध तडीपाराचा प्रस्ताव उपविभागीय अधिकार्‍याकडे पाठविला होता. त्यावर निर्णय घेऊन तुमसरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी बांडेबुचे यांना एका वर्षासाठी भंडारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश निर्गिमित केला.
हा आदेश विश्‍वनाथ बांडेबुचे यांना १0 सप्टेंबर रोजी तामील करण्यात येऊन त्यांना जिल्हा सोडून जाण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती, ती मुदत मंगळवारी संपली असल्याने बांडेबुचे यांनी मोहाडी येथून आपला बस्तान गुंडाळल्याचे समजते. भाजपच्या एका माजी आमदारांच्या अगदी जवळचे व विश्‍वासू अशी विश्‍वनाथ बांडेबूचे यांची ओळख होती. मात्र आता त्यांची बिनसली असून बांडेबूचे यांनी आता भाजपच्या दुसर्‍या आमदारांची कास धरली असून त्यांनी मुंढरी जिल्हपरिषदेची उमेदवारी सुद्धा मागितली होती, व कामाला सुध्दा लागले होते, परंतु हद्दपाराच्या आदेशाने घात केला. मात्र या कारवाई मुळे राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे