तिरोडा पोलिसांचे महिला सुरक्षा जनजागृती अभियान

0
36

तिरोडा, दि.15 : महिलांविषयक गुन्ह्यांवर प्रतिबंधक घालण्यासाठी महिला सुरक्षा जनजागृती अभियान संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात राबविले जात आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिलेले आहे. त्यानुसार आज बुधवार, 15 सप्टेंबर रोजी तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे महिला सुरक्षा जनजागृती मेळावा घेण्यात आला.

महिला सुरक्षा
मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक योगेश पारधी

या वेळी पोलीस विभागाच्या अधिकारी व मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नुकतीच राज्यात घडलेल्या नालासोपारा येथील घटनेसंबधी माहिती देण्यात आली. त्यानंतर महिलाविषयक गुन्ह्यांवर कसे आळा घालावे, महिला सुरक्षित राहण्याकरिता कोणती खबरदारी घ्यावी, मोबाईलवर फेसबुक अँपसंबधी सतर्कता कशी बाळगावी, महिला कौटुंबिक हिंसाचारसंबंधी शासन मदत, महिलांची होणारी फसवणूक व त्याबाबत त्यांनी कशाप्रकारे सजग राहून सतर्कता बाळगावी, याबाबत सविस्तर माहिती सांगण्यात आली.

याशिवाय अत्याचार पीडित महिलांना शासनस्तरावर कशी मदत मिळते, मोबाईलचा उपयोग-दुरुपयोग याबाबतची माहिती देण्यात आली. महिला सबलीकरण, नारी शक्ती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याकरिता तयारी कशी करावी. अशा विविध विषयांवर पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सरपंच तिमेस्वरी बघेले, प्राचार्य ठाकरे, मेश्राम, पंधरे, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, महिला समुपदेशक सोनम पारधी यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमला तिरोडा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार, महिला सैनिक, तिरोडा हद्दीतील महिला पोलीस पाटील, गाव सुरक्षा समितीच्या महिला सदस्या, शाळा-कॉलेजच्या विध्यार्थीनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक व संचालन बेरडीपारचे पोलीस पाटील रतनलाल खोब्रागडे यांनी केले. आभार नापोशि संजू बांते यांनी मानले.