नक्षल्यांचा घातपाताचा कट उधळुन लावण्यात पोलिसांना यश

0
22

गडचिरोली-21 सप्टेंबर रोजी होणार्‍या विलय दिनाच्या पार्श्‍वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावुन मोठी घातपाताची योजना आखली होती. मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळुन लावण्यात गडचिरोली पोलिस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.
भामरागड उपविभागाअंतर्गत येणार्‍या ताडगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना रविवारी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन घटनास्थळावरुन पळून गेले.
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, मोठ्या प्रमाणावर पिट्टू व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. आयईडी व कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असुन जवानांनी नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांचा मोठा शिबीर उधळुन लावण्यात यश मिळविले आहे.
अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी सदर अभियान यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे संकेत दिले.