नक्षल्यांकडून दोन युवकांची हत्या

0
137
file photo

गडचिरोली-पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी दोन युवकांची हत्या केल्याची घटना १४ एप्रिल रोजी एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलिस उपविभागांतर्गत येत असलेल्या पोलिस मदत केंद्र गट्टाच्या हद्दीत घडली.
अशोक नरोटे (२८) रा. गोरगुट्टा व मंगेश हिचामी (२७) रा. झारेवाडा अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील अशोक नरोटे हा आत्मसर्मपित नक्षलवादी असल्याची माहिती आहे.
तर मंगेश हिचामी याची पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, सुरजागडला पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.
नक्षलवाद्यांनी मंगेश हिचामी यास बुधवारी रात्री १0 वाजता व अशोक नरोटे यास रात्री एक वाजता घरातून बळजबरीने घेऊन गेले व त्यांची हत्या केली. या दोघांच्याही हत्येनंतर मंगेश हिचामी याचे मृतदेह झारेवाडा ते गट्टा रस्त्यावर आणून ठेवले तर अशोक नरोटे याचा मृतदेह गोरगुट्टा ते गिलनगुडा रस्त्यावर आणून ठेवला.
बुधवारी दुपारी २ वाजता सुरजागड लोहखनिक टेकड्यांवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाचा १२ तासांचा कालावधी उलटण्याआधीच नक्षल्यांनी दोन युवकांची हत्या करून आपला उपद्रव्य माजविल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले असून सुरजागड वादावरून नक्षली सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी व शोधमोहीम राबविण्यासाठी पोलिस विभागाने सुरजागड परिसरात मोठय़ा संख्येने कुकम पाठवून नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.