साकोली-नागपूर प्रवासादरम्यान घटना:धावत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर अतिप्रसंग

0
258

साकोली- अल्पवयीन विद्यार्थिनीला नागपूर येथे फिरायला जाऊ म्हणून एसटी बसने घेऊन जात असताना बसच्या शेवटच्या सीटवर विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला. वडिलांनी पोलिसांना केलेल्या तक्रारीवरून ही घटना उघडकीस आली.
साकोली तालुक्यातील बोदरा येथील आरोपी राजेश ईश्‍वर मडावी (१९ वर्ष) याने अल्पवयीन विद्यार्थिनीला नागपूर येथे फिरायला जाऊ म्हणून १२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास नागपूरला जाणार्‍या गोंदिया-नागपूर बसमध्ये घेऊन गेला. एसटी बसमध्ये साकोलीवरून ११ प्रवासी प्रवास करीत होते. रात्रीची वेळ असल्याने आणि बसमध्ये वाहक नसल्याचे पाहून आरोपीने बसच्या शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनिसोबत अतिप्रसंग केला. नागपूरला पोहोचल्यानंतर आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या नातेवाईकाकडे घेऊन गेला. त्या नातेवाईकाला राजेश मडावी व अल्पवयीन मुलीवर संशय आल्याने त्याने राजेश व अल्पवयीन मुलीला ताबडतोब आपल्या घरून निघून जाण्याचे सांगितले. तेव्हा राजेश व अल्पवयीन विद्यार्थिनी रात्रीच बोदरा येथे परतले.
दुसर्‍या दिवशी १३ एप्रिल रोजी विद्यार्थीनीच्या वडीलांनी पोलीस स्टेशन साकोली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, बोदरा येथील पोलीस पाटलांनी सदर बेपत्ता असलेली विद्यार्थिनी ही राजेश मडावी याच्यासह बोदरा येथे असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ बोदरा गावात जाऊन बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनी व आरोपी राजेश मडावी याला ताब्यात घेतले. पीडित मुलीची व आरोपी राजेशची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या आधारावर पोलिसांनी आरोपी राजेश मडावी याच्यावर कलम ३७६, ३६३, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. प्रकरणाच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर करीत आहेत.