चारचाकी वाहनाचा अपघात,सासू-सुनेचा जागीच मृत्यू

0
133

चंद्रपूर दि १५ एप्रिल- मोठ्या भावाचा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना अचानक जनावर समोर आल्याने चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन त्यात सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास चिचपल्ली जवळ घडली. मृतक व जखमी हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी चंद्रपुरात मोठ्या भावाच्या पुण्य स्मरणाचा कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी अनिल पारखी आपल्या कुटुंबियांसह चंद्रपूर येथील आपल्या घरी गेले होते. कार्यक्रम आटोपून शुक्रवारी सकाळी कर्तव्यावर रुजू व्हायचे असल्याने अनिल पारखी कुटुंबियांसोबत चामोर्शीला येत असतांना चिचपल्ली जवळ अचानक जनावर समोर आल्याने चारचाकी वाहन क्रमांक एमएच-३३-व्ही-९६८८ चे नियंत्रण सुटले व वाहन चार वेळा पलटी होत चिचपल्ली जवळ नवीन बनलेल्या पुलाच्या खाली कोसळली.

यात अनिल पारखी यांची पत्नी किरण पारखी (३२), आई शोभा पारखी (६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल पारखी (४०) यांसह साधना पारखी (४५), राम पारखी (०७), आराध्या पारखी (४), ओम (१०) व नंदिनी (१४) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे.

अपघात झाल्यानंतर पारखी कुटुंबियांचे सर्व सामान गाडी खाली पडले. काही लोकांनी संधी साधून पर्स मध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याची चर्चा आहे.