मोबाईल टॉवरवर चढलेला 60 वर्षीय व्यक्ती अखेर वाटाघाटीनंतर उतरला

0
54
अपघाती विमा मिळाला नसल्याचे कारण
गोंदिया/रावणवाडी,दि.15ः,  मुलाचे अपघाती निधन होवून वर्ष लोटले. एकीकडे न्यायालयीन खटला सुरू आहे, तर दुसरीकडे अपघाती विमा देखील मिळाला नाही. या त्रासाला कंटाळून आपल्याला न्याय मिळावा, याकरिता  तालुक्यातील खातीया येथील 60 वर्षीय व्यक्ती वासुदेव रामू तावाडे हा व्यक्ती गुरुवारी पहाटे पाच वाजतापासून मोबाईल टॉवरवर चढला. त्याची समजूत काढण्यात प्रशासनाची तारांबळ उडाली होती,अखेर आज शुक्रवारला(दि.15) नायब तहसिलदार पालांदूरकर यांच्यासोबत झालेल्या वाटाघाटीनंतर सायकांळी 5.30 वाजता तावाडे हे टाँवरवरुन खाली उतरले.
14 एप्रिल रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची 131 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासन जयंती कार्यक्रमाच्या बंदोबस्तात व्यस्त होता. अशातच खातीया येथील वासुदेव रामू तावाडे हा व्यक्ती गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास गावातीलच मोबाईलच्या टॉवरवर चढला होता. आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू वर्षभरापूर्वी झाला. त्याचा अपघाती विमा अद्याप मिळाला नाही. दुसरीकडे न्यायालयीन लढ्यामुळे आपली मानसिक आणि आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा आरोप करून आपल्याला तातडीने विमा रक्कम देण्यात यावी, या मागणीकरिता वासुदेव तावाडे टॉवरवर चढले. याची माहिती होताच पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू आणि अग्नीशमन विभागाने त्याठिकाणी धाव घेतले. रावणवाडीचे ठाणेदार आणि पोलीस उपअधीक्षक ताजने यांनी घटनास्थळाला भेट घेवून वासुदेव तावाडे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते,अखेर आज तवाडे यांनी नायब तहसिलदारासोबत झालेल्या चर्चेनंतर उतरण्याचा निर्णय घेत खाली उतरले.