बारव्हाच्या वैद्यकीय अधिकारी अपघातात ठार

0
76

लाखांदूर- अनियंत्रित कारला अपघात झाल्याने लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकार्‍याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला. ही घटना १७ एप्रिलच्या रात्री उमरेड-भिवापूर राज्यमार्गावर घडली.
डॉ. अस्मिता नंदेश्‍वर असे मृत वैद्यकीय अधिकार्‍यांचे नाव असून सुमित दौलत नंदेश्‍वर (३0) रा. मांढळ असे जखमी पुतण्याचे नाव आहे. डॉ. अस्मिता यांची मुलगी नागपूर येथे शिक्षण घेत आहे. तिच्या भेटीसाठी त्या व त्यांचा पुतण्या सुमित हे नागपूर येथे गेल्या होत्या. भेटीनंतर नागपूरवरुन बारव्हा येथे परत येत असताना रात्रीच्या सुमारास उमरेड राज्यमार्गावर मारुती सुझुकी कार क्रमांक एम. एच. ३६ एच ८२८८ रस्त्याच्या कडेला आदळली. त्यामुळे त्यांची कार रस्त्यावर आडवी झाल्याने पाठीमागून येणार्‍या वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. अन्य दोन वाहनाने धडक दिल्याने डॉ. अस्मिता यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या गंभीर आहे.